पान:भूमी आणि स्त्री.pdf/२२६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 एकूण भारतीय सण ऋतुचक्राशी जोडलेले आहेत आणि ऋतुचक्र कृषीशी जोडलेले आहे. काळाच्या विकासात या सणांना नवे आयाम दिले गेले. श्रावण पौर्णिमा उत्तरेत राखी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. भाऊबहीण या नात्याला धर्म, जात या पलीकडचा संदर्भ मिळाला. दर्यावर्दी जीवन जगणाऱ्यांच्या दृष्टीने महाराष्ट्रात ती नारळी पौर्णिमा झाली परंतु उत्तर भारतातून आलेली राखी पौर्णिमा आज मराठवाडा, महाराष्ट्रात रुजली आहे.
 इतर प्रांतांतील सणांवर ओझरता दृष्टिक्षेप : मूलभूत साम्य -
 भूमी वर्षन आणि सर्जन यांच्याशी जोडलेल्या मराठवाडा व महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व्रतोत्सवविधी, सणांचा शोध घेण्याचा प्रयत्न या प्रकरणात केला आहे. भारतातील भूमीच्या सुफलेतेशी जोडलेल्या सणांत मूलभूत एकात्मता असल्याचा प्रत्यय पदोपदी येतो. त्या दृष्टीने या अनुबंधाशी जोडलेल्याया काळात येणाऱ्या इतर प्रांतांतील सणांवर दृष्टिक्षेप टाकणेही महत्वाचे ठरेल. कर्नाटकात ज्येष्ठी पौर्णिमेला वटवृक्षाची पूजा केली जाते: दक्षिणेत ज्येष्ठी पौर्णिमा हा शेतकऱ्यांचा महत्त्वाचा दिवस असतो. आंध्रात या दिवशी जमिनीत प्रथम नांगर घालतात. सायंकाळी बैल सजवून शेतात नेतात. शेत चांगले पिकावे, वर्षभर शेतावर संकटे येऊ नयेत म्हणून मातीची प्रार्थना करतात. उमरगा, सोलापूर भागातील शेतकरी, विशेष करून लिंगायत समाजातील शेतकरी हा रिवाज पाळतात. श्रावणातील पंचमीच्या आदल्या दिवशी स्त्रिया वारूळाला जातात.
 सांतेरीचे मंदिर वारुळाचे असल्याचे पूर्वी नोंदविले आहे. श्रावण शुक्रवारी स्त्रिया मातीच्या घटांची पूजा करतात. ही गौरीपूजा असते. आंध्रात श्रावण अष्टमीस मातीच्या घड्यात निंबाची पाने ठेवून त्यावर लहान गाडगे ठेवतात. त्यात दिवा लावून त्याची मिरवणूक काढतात. नागपंचमीला वारूळाची पूजा होते. भाद्रपद शुद्ध तृतीयेस महाराष्ट्रात हरितालिका साजरी करतात. आंध्रातही कुमारिका हे व्रत पाळतात. त्याला अटलतट्ट किंवा सोळा गौरीनामू असे म्हणतात. आंध्रात गणेशचतुर्थीला विनायक चौथ म्हणतात. दुसऱ्या दिवशी नंदादीपाजवळ ठेवलेली ही

भूमी आणि स्त्री
२२१