आली. पण या घरी तिला तिचे अवकाश मिळाले नाही. त्यामुळे तिच्या ओव्यांत माती आणि माहेर सतत डोकावते.
पड़ पड़ मेघराजा बंधवाच्या शेतावरी
आलिया दिवाळी भयनीचा खर्च भारी
जोंधळ्या बरुबरी किती वाढशील उसा
आस दिवाळीची माले बंधू संगे भासा....
सासरी डोक्यावरचा पदर कपाळ झाकेपर्यंत घ्यायला हवा. ती तिची मर्यादा. पण माहेर म्हणजे मोकळपणा. भाऊबीजेसाठी येणारा भाऊ पाहून ती म्हणते -
खांद्यावरचा पदर डोकीवर मी झोकीला
शेताच्या बांधाला बंधुराजा मी देखीला ....
दिल्या घेतल्यानं नाही पुरत एरावती
बंधूराजाची ग्वाड बोलांची रसवंती....
भारतीय सण : ऋतुचक्राशी जोडलेले आणि ऋतुचक्र कृषिशी-
ज्येष्ठ,आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक या सहा महिन्यांत भूमीवर्षन यांच्या संयोगातून होणारे, सर्जन या अनुबंधाशी जोडलेले सण, व्रते, उत्सव येतात. ज्येष्ठी पौर्णिमेला नांगर शेतात घालायचा. आषाढ़ात पेरणी आणि वृक्षपूजा. श्रावणात वारुळाची, शेताची संरक्षक नागदेवता आणि मांगल्याची पानाफुलांच्या माध्यमातून पूजा. भाद्रपदात धान्य कणसे निसवतात. धान्यलक्ष्मीची चाहूल स्पष्ट होते. म्हणून गौरीगणपती, लक्ष्म्या यांची पूजा. आश्विनात या धान्यात... दाण्यांत दूध भरू लागते आणि रब्बीच्या पेरणीची तयारी सुरू होते. लक्ष्मीच्या त्रिरूपांची पूजा आश्विन नवरात्रात. आश्विनाच्या अखेरी व कार्तिकात धान्य घरात येते. ज्या धान्याचा विनिमय पैशाने होतो असे पीक म्हणजे कापूस (कपाशी, शेंगदाणे इ.) त्यामुळे लक्ष्मीपूजनास रूपयाची पूजा होते. कृषिवर आधारित व्यवहार या काळात होऊन पैसे घरात येतात. व्यापाराला चालना मिळते. म्हणून धनलक्ष्मीचे पूजन.