Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/२२४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 भाऊ बहिणीच्या नात्यांचा ओलावा सांगणाऱ्या हजारो ओव्या महाराष्ट्रातील स्त्रियांनी रचल्या आहेत.
 यमद्वितीयेच्या कथेचे विवेचन यापूर्वी केलेच आहे.
 माती आणि माहेर यांच्याशी दृढ नाते -
 मानवी विकासाच्या प्रवासात नात्यांचे निश्चितीकरण, त्यांना दिलेली भावनिक प्रतीकात्मकता हा टप्पा अत्यन्त महत्त्वाचा आहे. मानसिक संवेदन शक्तीची आणि स्वरयंत्राच्या साहाय्याने निर्माण केलेल्या भाषेची स्पंदने माणसाला निसर्गाने दिली. त्याद्वारे त्याने इतर प्राणिमात्रांपेक्षा आपले वेगळेपण सिद्ध केले.
 मानवी संस्कृतीच्या आदिपर्वातील यातुश्रद्धा ही समूह श्रद्धा होती. जीवनातील सारेच प्रश्न समूहाचे होते. 'मी' जन्माला आलेला नव्हता. मानवी जीवनाचे अस्तित्व 'आम्ही' त सामावलेले होते. जीवनाला सुख देणारे सुलभ करणारे अन्न देऊन मृत्यूचे भय नाहीसे करणारे तीन महत्त्वाचे आधार होते - एक वनस्पती शेती, दुसरा पशुधनाचा आणि तिसरा अग्नीचा. या तिहींचा संगम दिवाळीत आहे.
 निसर्गाशी त्याच्या संहारक रूपाशी संघर्ष करून उरण्याची दुर्दम्य प्रेरणा यातुश्रद्धेने मिळाली आणि यातुश्रद्धा या समूहप्रधान असतात. स्त्रियांची बहुतेक व्रते, विधी, उत्सव हे समूहाने साजरे केले जातात.
 स्त्री ही सर्वार्थाने सृजनशक्ती होती. धान्य पेरणारी, काढणारी, ते जास्तीतजास्त दिवस टिकवण्यासाठी विविध प्रयोग करणारी आणि त्याचे अग्नीच्या साहाय्याने पूर्णान्न बनवणारी तीच. दूधभत्याची निर्मिती त्यापासून विविध पदार्थ तयार करणारी तीच. वस्त्र विणणारी तीच. त्यामुळे जमिनीची सुफलता वाढविण्यासाठी केल्या जाणाऱ्या यातुश्रद्धा तिच्याशी जोडलेल्या दिसतात. या विधींशी जोडलेली गीते स्वरसमूह तिनेच निर्माण केले असावेत. तिचे भावविश्व जसजसे बदलत गेले तसतसे त्या गाण्यांतील संदर्भ बदलत गेले. पण माती आणि माहेर यांच्याशी असलेले तिचे अतूटपण गीतामधून सतत जाणवते. काळाच्या ओघात मातृसत्तेची जागा पितृसत्तेने घेतली. स्त्री घर सोडून पतीच्या घरी कायमची

भूमी आणि स्त्री
२१९