Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/२२२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

यज्ञात याचक म्हणून गेला व तीन पावले जमीन मागितली. एक पाऊल स्वर्गात दुसरे मृत्युलोकात तर तिसरे बळीच्या डोक्यावर ठेवले. त्याला पाताळात पाठवले. कार्तिक शुद्ध प्रतिपदेला समाज तुझे स्मरण करील असा वर दिला. परंतु बळीचे राज्य येवो अशी शुभेच्छा शेतकरी समाज विविध विधीतून सतत करत असतो. कारण बळी हा शेतकरी होता. आपल्याकडे शेतकऱ्याला बळिराजा म्हणत. केरळात श्रावणात ओणम् हा सण दिवाळी इतक्या थाटात साजरा होतो. अंगणात बळीचे प्रतीक म्हणून मातीचा ओटा तयार करतात. त्याभोवती रांगोळी घालतात. फुलांनी सजवतात. रात्री फेर धरुन कैकद्विकळी हे नृत्य करतात, घरापर्यंत मातीची फुलांची पावले काढतात. या दिवशी पाताळात ढकलला गेलेला बळिराजा भेटायला येतो अशी समजूत आहे. पूर्वी बाली बेट भारताला लागून होते त्याला पाताळ म्हणत. बाहेरुन आलेल्या टोळ्यांनी बळिराजाला रेटत रेटत बाली बेटांत नेले. थर्स्टन नावाच्या शास्त्रज्ञाने तर ऑस्ट्रेलियातील लोकांचे व वनस्पतीचे दक्षिण भारतातील लोकांशी साम्य असल्याचे दाखवून दिले आहे.
 बळिराजा शेणाचा करतात. शेणाला शुभा म्हणतात. शेण हे सर्वात उत्तम खत. या सर्व बाबींचा अनुबंध महत्त्वाचा आहे.
 भाऊबीज ऊर्फ यमद्वितीया -
 जी स्त्री भूमीस्वरूपा सर्जनतेचे प्रतीक मानली गेली. सन्माननीय मानली गेली ती काळाच्या प्रवासात दुय्यम दासीसमान झाली. तिचे जगणे अत्यन्त दुःखमय झाले. रात्रंदिवस कष्ट करणे आणि खाली मान घालून समाजात व कुटुंबात दुय्यम दर्जाचे जिणे जगणे एवढाच तिच्या जीवनाला अर्थ उरला. निदान प्रत्यक्षात तरी तिने आपले दुःख दगडी जात्याजवळ मोकळे केले. तेवढाच तिला आधार होता.
 ती स्त्रीचा जन्म दिल्याबद्दल परमेश्वराला म्हणते -

बाईचा जलम कुनी घातला येड्यानं
बैल राबतो भाड्यानं, परक्याचे दारी ....
लेकीचा जलम नको घालू श्रीहरी
मोठी कठीन चाकरी परक्याचे दारी....

भूमी आणि स्त्री
२१७