पान:भूमी आणि स्त्री.pdf/२२१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 धनत्रयोदशीचा दिवा नर्कचतुर्दशीला घरातून फिरतो या दिवशी पुरुषांच्या आंघोळी असतात. त्यांना तेल चोळून, उटणं लावून, सुंगधी आंघोळ घालून ओवाळतात. या दिवशी घरातील घाण, दुर्गंधी दूर होवो अशी प्रार्थना करतात.
 दिवाळीची अमावास्या ऊर्फ लक्ष्मीपूजन -
 लक्ष्मीपूजनाचा दिवस सर्वात महत्त्वाचा या दिवशी खरी दिवाळी. लक्ष्मीचे.... सुबत्तेचे पूजन. पण ही सुबत्ता येते कुठून ?

लक्ष्मी आई आली शेताच्या बंधाऱ्यानं
शालू भिजला दवरांन माय माझ्या लक्ष्मीचा....
आई लक्ष्मी आली बैलाच्या खालती
माज्या बाळाला बोलती अवंदा माल झाला किती?
आई लक्ष्मी आली सोन्याच्या पावलानं
वाडा चढे डौलानं,माझ्या राजसाचा:..
आई लक्ष्मी आली, वाडा सोडून दुकानाला
सोनं मागे काकणाला, बाळ राजसाला

 अमावास्येला लक्ष्मीपूजन असते. घर पणत्यांनी सजवतात. रांगोळ्यांनी अंगण सजते. रांगोळ्यांच्या संदर्भातील विवेचन भोंडला भुलाबाई या प्रकरणात सविस्तरपणे आले आहे. या दिवशी सायंकाळी दिव्यांची पूजा असते. ताट भरून मातीच्या पणत्या चेतवून देवासमोर वा बैठकीत लक्ष्मीची प्रतिमा ठेवून तिच्यासमोर खाली तांदूळ गहू ठेवून त्यावर पणत्यांचे ताट ठेवतात. ताटात ७,११,१५ अशा पणत्या स्वस्तिक काढून त्यावर मांडतात. पणत्यांची पूजा फक्त स्त्रियाच करतात. तसेच दौत, वही यांची पूजा करतात. वहीवर श्री लिहून नव्या वर्षाचे हिशेब लिहिण्यास प्रारंभ करतात. वैश्य... व्यापारी समाजाचे वर्ष कार्तिक प्रतिपदेपासून सुरू होते. प्रसाद म्हणून साळीच्या लाह्या, बत्तासे, खडीसाखर वाटतात. पूजेत धने, मूग, गूळ यांचा समावेश असतो.
 बलिप्रतिपदा -
 बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू. तो सत्तेने माजला त्याने देवांना जिंकून लक्ष्मीला दासी केले. तेव्हा विष्णूने वामनाचा अवतार घऊन त्याचा नाश केला. बळीकडे तो

२१६
भूमी आणि स्त्री