पान:भूमी आणि स्त्री.pdf/२०६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लाभले आहे. बौधायनगृह्य सूक्तातील तिचे रूप 'कुंभिनी हस्तिमुखा विघ्नपार्षदा' असे आहे. हे रूप गणेशाशी जुळणारे आहे. दैवत शास्त्राचे मान्यवर अभ्यासक श्री. रा. चिं. ढेरे लिहितात श्रीसूक्तानुसार लक्ष्मी हस्तिनादप्रबोधिनी असून गजलक्ष्मीच्या रूपात आहे. गज हे पुरुषत्वाचे प्रतीक आहे. कनिष्ठ लक्ष्मीचा सहचर म्हणून गज समृद्धीकारक ठरला. तर ज्येष्ठा अलक्ष्मी आणि कनिष्ठा लक्ष्मी एकाच देवी संकल्पनेची द्वंद्वात्मक रूपे आहेत. यातून दैवत कल्पनांचा विकासक्रम जाणवतो. तसेच परस्परसंबंधीची कूटे उलगडण्यास मदत होते.
 ज्येष्ठेच्या घरी कनिष्ठा दोन दिवसांची पाहुणी -
 लक्ष्म म्हणजे शुभ. शुभगुणांनी युक्त ती लक्ष्मी.
 ज्येष्ठेच्या कथाबंधानुसार 'भर्तृत्यागेन दुःखिता' अशा अलक्ष्मीकडे, ज्येष्ठेकडे कनिष्ठा लक्ष्मी येते. लक्ष्म्या घरी आणताना 'ज्येष्ठेच्या घरी कनिष्ठा आली' 'सोन्याच्या पावलांनी आली' असा मंत्र म्हटला जातो. पाहुणी आलेली माहेरवाशीण लक्ष्मी दोन दिवसांची पाहुणी असते. मोठ्या बहिणीकडे आलेली धाकटी बहीण माहेरवाशीण असते. लक्ष्मी दोन दिवस येते. घराघरात शेताभातात हिंडून समृद्धी देऊन स्वतःच्या घरी निघून जाते.
 लक्ष्मी या कल्पनाबंधाकडे समाजाची पाहण्याची दृष्टी -
 लक्ष्मी या कल्पनाबंधाकडे सामाजिकदृष्ट्या... आर्थिकदृष्ट्या शेवटच्या स्तरातला समाज 'संहारक देवता' म्हणून पाहतो. तिचा कोप होऊन घरात, शेताभातात अनिष्ट होऊ नये या भूमिकेतून पूजा होते.
 मध्यमवर्गीय समाज तिच्याकडे शुद्धीची देवता म्हणून पाहतो. केरसुणीला लक्ष्मी मानले जाते. विवाह पूजा यांत सूप महत्त्वाचे असते. सूप समृद्धीचे प्रतीक. ते कचरा आणि धान्य यांना वेगळे करते. दृष्ट आणि अनिष्ट यांना वेगळे करून इष्टाकडे नेते ती लक्ष्मी. शुभा म्हणजे शेणाची गोवरी. घर गाईचे शेणाने घर सारवतात. शुद्ध करतात. गोवरीच्या धुराने घर शुद्ध होते. किडामुंगी नष्ट होतात. आर्थिकदृष्ट्या वरचा थर तिला समृद्धीची देवता मानतो. या तीनही रूपांत लक्ष्मी सर्वत्र पूजनीय असते.

भूमी आणि स्त्री
२०१