Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/२०५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ज्येष्ठेच्या घरी कनिष्ठा का आली? -
 लक्ष्म्या वा गौरीच्या कुलाचाराचा, सणाचा शोध घेताना ज्येष्ठा आणि कनिष्ठा यांचा मूळ रूपबंध पाहणे महत्त्वाचे ठरते. अमृत प्राप्तीसाठी देवासुरांनी समुद्रमंथन केले. तेव्हा समुद्रातून लक्ष्मीच्या जन्माआधी अलक्ष्मीचा जन्म झाला. समुद्रातून प्रगट होताच तिने 'किं कर्तव्यं मया?' असा प्रश्न केला त्यावर देवांनी तिला तिच्या दृष्टीने योग्य अशा अशुभ, अनिष्ट, दुःखमय अशा ठिकाणी संचार करण्यास सांगितले. हे सांगत असताना तिचा उल्लेख ज्येष्ठा, पापदारिद्र्य दायिनी, कलुषदायिनी शुभा असा केला. ती लक्ष्मीपूर्वी जन्मली म्हणून ज्येष्ठा. शुभा हे तिचे शोभन नाव. शुभा याचा अर्थ शेण असाही आहे.
 अलक्ष्मीनंतर लक्ष्मी बाहेर आली. तिच्यावर विष्णु भाळले. त्यांनी विवाहाचा प्रस्ताव मांडला. परंतु ज्येष्ठे आधी कनिष्ठेचा विवाह सन्मान्य नव्हता. म्हणून लक्ष्मीच्या आग्रहाखातर विष्णूने अलक्ष्मीचा विवाह उद्दालक मुनींशी लावला. परंतु आश्रमातील सात्विक वातावरणात तिची घुसमट होऊ लागली. तिला ते वातावरण सोसेना. तिने उद्दालकाला आपल्या आवडी निवडी सांगितल्या. त्या ऐकून उद्दालकमुनी अस्वस्थ झाला. त्याने तिला एका अश्वत्थवृक्षाखाली बसविले आणि तुझ्या योग्य जागा शोधून तुला घेऊन जातो. असे सांगून गेला तो पुन्हा आलाच नाही. पिंपळाखाली बसलेली ज्येष्ठा पतीची वाट पाहून थकली व आक्रोश करू लागली. तिचा आक्रोश ऐकून लक्ष्मी व विष्णू भेटण्यास आले. विष्णूने तिला सांगितले की तू याच झाडाखाली स्थिर हो. प्रती शनिवारी लक्ष्मी तुला भेटण्यास येईल त्या दिवशी हा वृक्ष पूज्य मानला जाईल. जे गृहस्थ तुझी नित्य पूजा करतील त्यांचे ठायी तुझी बहीण लक्ष्मी स्थिर होईल. अशीच कथा लिंग पुराणातही आहे. त्यात पतीचे नाव मात्र दुःसह आहे.
 आद्यपूजेचा मान ज्येष्ठेला का ? -
 'दुर्जनं प्रथमं वन्दे' ही मानवी प्रवृत्ती आहे. त्यातूनच विघ्नदेवतांची पूजा प्रथम करून त्यांना संतुष्ट करून त्यांनी आपल्यावर वक्रदृष्टी होऊ नये याची काळजी घेण्याची परंपरा निर्माण झाली. ज्येष्ठेचे रूप अलक्ष्मीला तिच्या विघ्नस्वरूपात

२००
भूमी आणि स्त्री