Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/२०४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असतातच. संस्कृतीच्या विकासात या मूलभूत प्रेरणांचे शमन करीत उदात्तीकरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली. निसर्गातील अनाकलनीय घटनांबद्दलचे भय आणि म्हणून त्यापासून सुरक्षितता. या दोन भावनांच्या ताण प्रतिताणांतून देवकल्पनांचा उदय झाला. स्त्रीत निर्मिती करण्याची यातुशक्ती असते, या कल्पनेतून मानवाला स्त्रीबद्दल भय वाटले. पण त्याच वेळी स्तन्य पाजणारी, बालकांची काळजी घेणारी, त्याच्यावर कोसळणाऱ्या अशुभाचा संहार करण्यासाठी जागरुक असलेली स्त्री सुरक्षितता देणारी आहे याचा प्रत्यय आला. त्यातूनच तिची विविध रूपे पूजनीय ठरली. अन्न,वस्त्र, निवारा यांसाठी सुरुवातीला निकराचा संघर्ष करावा लागे. तेव्हा स्त्रीपुरुष दोघेही समान स्थितीत होते. विविध साधनांच्या शोधांमुळे हा संघर्ष कमी होऊन त्याबाबतची शाश्वती वाढली. ज्ञानाच्या जाणीवेच्या कक्षा रुंदावत असताना. निर्मितीत असलेल्या पुरुष सहयोगाची कल्पना त्याला आली. निर्मिती आणि नंतरची अपत्याची काळजी यात गुंतलेल्या स्त्रीला नव्या साधनांची कळ हस्तगत करणे शक्य झाले नाही: एकीकडे अन्न, वस्त्र, निवान्यासाठी मनुष्यबळ निर्माण करणारी तीच होती. त्याची गरज होतीच. यांतून स्त्रीवर स्वामित्व असेल तरच आपण सुरक्षित राहू याची जाण पुरुषाला आली आणि प्रारंभी स्त्रीच्या पूजनीय असलेल्या निखळ मातृत्वाविषयीची धारणा बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली. स्त्रीचे पुरुषनिरपेक्ष मातृत्व त्याला जाचक वाटू लागले. स्वामित्वाची संकल्पना त्यातून आली. अपत्यावर त्याच्या जन्माला कारणीभूत असलेल्या पुरुषाच्या, पित्याच्या नावाचे शिक्कामोर्तब होऊ लागले. ती स्त्री कुणाच्या स्वामित्वाखाली आहे त्याला महत्त्व आले, म्हणजेच पितृप्रधान वा पुरुषप्रधान व्यवस्था आली. देवता मंडलात पुरुषदेवांचा शिरकाव होऊन त्यांचे महत्त्व वाढले. तरीही मातृदेवांचे महत्त्व मात्र कमी झाले नाही.
 समाजातील स्त्रीभोवती पावित्र्य-अपावित्र्य, सातित्व-पातिव्रत्य या कल्पनांचे जाळे वेढले गेले. ती पुरुषाश्रयी आणि अपत्य निर्मितीचे व मैथुनसुख घेण्याचे एक साधन बनली.
 असे असले तरी बुद्धीचा विकास करणारी सरस्वती, दुष्ट व अशुभाचा संहार करणारी दुर्गा, समृद्धी देणारी लक्ष्मी, निर्मिती व पोषण करणारी धरणी, यांच्याबद्दलची श्रद्धा मानवी मनात मूळ धरून राहिली. ती या व्रतांतून जाणवते.

भूमी आणि स्त्री
१९९