योनी व लिंगपूजक होता. त्यांना आर्य हेटाळणीने शिश्नपूजक असे म्हणत. आर्य आणि आर्येतरांच्या संघर्षातून, देवाणघेवाणीच्या प्रक्रियेतून आर्यांचा रूद्र आणि आर्येतरांचा शिश्नदेव यांच्या संकरातून शिवशंकर अस्तित्वात आला. महादेवी, भूदेवी, लक्ष्मी या देवता योनिपूजेच्या उन्नयनातून अस्तित्वात आल्या. शंकराची सहचारिणी गौरी. ती महादेवी भूदेवीचे रूप. महालक्ष्मीच्या सणाच्या निमित्ताने गायिल्या जाणाऱ्या गाण्यांत ओव्यांत तिचा सहचर म्हणून शंकराचा उल्लेख आहे. कारण ही महालक्ष्मी म्हणजे गणपतीची आई, महादेवी गौरी ऊर्फ पार्वती आहे. मात्र या शंकराच्या सहचारिणीचे अस्तित्व सहचराइतकेच स्वतंत्र आणि स्वयंभू आहे. शिवलिंग आणि योनी विश्वसर्जनाचे महालय आहे. शिवात शक्ती आहे तर शक्तीत शिव समाविष्ट आहे. सृष्टीजीवनाची सुफल संपूर्णता त्यांच्या एकरूपत्वात आहे आणि याचा प्रत्यय धरणीच्या सुफलीकरणाशी निगडित व्रतसण, उत्सवांतून पदोपदी जाणवतो.
एषा भगवती देवी सर्वेषां कारणं हि नः ।
महाविद्या महामाया पूर्ण प्रकृतिर् व्यया !!
असे पोथीपुराणांतून म्हटले आहे ते तिच्या स्वतंत्र अस्तित्वाचा प्रत्यय येतो म्हणून.
कुलस्वामिनींच्या मंदिरांचे वेगळेपण -
कुलस्वामिनींची मूळ ठाणी वा मंदिरे वा शक्तिपीठे यांच्या बाह्य स्वरूपात आजवर बरेच बदल झाले तरी एक अत्यन्त महत्त्वाची गोष्ट कायम आहे. लोकसाहित्य आणि लोकपरंपरांच्या चिकित्सक अभ्यासक डॉ. तारा भवाळकर 'लोकसंचित' मध्ये नोंदवतात. सर्व आदिशक्तिपीठे ही फक्त स्त्रीदेवतांतीच मंदिरे आहेत. कोणताही पुरुषदेव वा सहचर त्यांच्या शेजारी नाही. पुरुष देव असला तर तो काही अंतरावर दूर स्वतंत्रपणे उभा आहे. स्त्रीदेवता स्वंतत्र आहे आणि तरीही ती माता आहे. आई आहे आणि पुरुषदेवनिरपेक्ष असलेले तिचे हे मातृरूप पूजनीय आहे. यातला गूढार्थ अत्यन्त क्रान्तिकारक असा आहे.
मानवाने स्त्रीरूप आणि भूमिरूप परस्पर रूपात पाहिले. स्त्रीरूपाच्या विविध अवस्था कुमारिकेपासून वृद्धेपर्यंत त्याला लक्ष्मीरूपीच वाटल्या.
मनुष्य हा मूलतः प्राणीच.'आहार निद्रा भय मैथुनंच' यामूलभूत प्रेरणा त्यालाही