पान:भूमी आणि स्त्री.pdf/२०२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

देण्याची हमी मातृत्वात असल्याने, जगातील सर्व प्राचीन संस्कृतीतील आद्य देवता या स्त्री देवता आहेत. भूमी अन्नधान्याची निर्मिती करून, वनस्पतींची निर्मिती करून सृष्टीतील मानव समूहाच्या शारीरिक, मानसिक बौद्धिक विकासाची आणि सुरक्षिततेची हमी देते. भूमीचे रूप स्त्री देवतांत आद्य मानवाने पाहिले.
 स्त्रीची विविध रूपे : महालक्ष्मीत.... देवीरूपात -
 अशी श्रद्धा आहे की महालक्ष्मीचे रूप सकाळी कुमारिकेचे दुपारी सुवासिनीचे तर सायंकाळी प्रौढेचे होते. कर्नाटकातील १५यल्लम्मा चैत्री पौर्णिमेला सुवासिनी होते, तर मार्गशीर्ष अमावास्येला विधवा होते.
 चैत्रात वसंतऋतूची चाहूल लागते. फुलांना बहार येतो. झाडांना कोवळी पाने फुटू लागतात. चैत्र पाडव्याला शेतीत काम करणाऱ्या सालदारांचे वर्ष सुरू होते. वैशाख ज्येष्ठात जमीन भाजली जाते. या भाजण्यातून तिची उर्वराशक्ती वाढते. पेरणीसाठी जमिनीची मशागत याच काळात शेतकरी करतो. मृगाचा, वळिवाचा पाऊस पडला की पेरणी करतो. भाद्रपद, आश्विनात पीक परिपक्व होते. कार्तिक मार्गशीर्षात ते हाती येते. मार्गशीर्षात पानगळ सुरू होते. थंडीने जणु अवधी सृष्टी काकडून जाते. तीन महिन्यांचा काळ पौष, माघ व फाल्गुन हा काळ सृष्टीच्या भूमीच्या दृष्टीने वैधव्याचा, भाग्यहीनतेचा वाटला असेल का?
 आपले सण, व्रते, उत्सव, दैवत कल्पना भूमीशी किती जोडलेली आहेत याची जाणीव तसेच आपल्या सांस्कृतिक वैभवाची संपन्नता या व्रतांमागील भूमिकेतून आपल्या लक्षात येते.
 सृष्टीजीवनाची सुफल संपूर्णता : शिवशक्तीच्या स्वंतत्र अस्तित्वात आणि एकरूपतेत -
 स्त्रीतील सर्जन सामर्थ्यांचे गूढ तिच्या योनीत आहे हे जाणल्यावर योनिपूजा रुढ झाली. पुरुषलिंगातील सर्जन सामर्थ्याचे ज्ञान झाल्यावर लिंगपूजा श्रद्धेय झाली. जगभरच्या अति प्राचीन संस्कृतीत लिंगयोनिपूजा रुढ होती. मोहंजोदारोच्या उत्खनात सापडलेल्या योनी मूर्ती सुफलीकरणाच्या देवता होत्या. भारतात आर्य येण्यापूर्वी एतद्देशीय आर्येत्तर समाज सुफलीकरणाच्या देवता म्हणून

भूमी आणि स्त्री
१९७