Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/१९३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हात उमटवून ते घरभर उमटवतात. त्या पाण्यात १६, ११, ९, ७, ५ पदरी दोरे बुडवून पोवते तयार करतात. दोघींच्या नावे करतात. पैकी एक समोरील पिलाच्या डोक्यावर, तर उरलेले चार लक्ष्मीच्या डोक्यावर ठेवतात. दुसऱ्या दिवशी या पोवत्यांना गाठी मारतात. त्या गाठीत पुढील वस्तूंचा तुकडा बांधतात. खारीक, लवंग, हळदकुंकू, धोतऱ्याचे फूल, नागवेलीचे पान, हरळी, आखाडा, झेंडूचे पान, रेशीम धागा, घोंगडीचा धागा, ते दोरे लक्ष्म्यांपुढील धान्याच्या राशीत पुरतात. तिसरे दिवशी सकाळी हळदीकुंकू वाहताना तेदोरे बाहेर काढतात. लक्ष्म्यांची ओटी भरतात. ते दोरे, निर्माल्य आदी शेतात नेऊन पुरतात. उरलेले अन्न दुसऱ्यास देत नाहीत. ते शेतात नेऊन पुरतात. भूमीची सुफलनशक्ती वाढावी या साठीचा हा विधी (Ritual) असावा. हा रिवाज काटेकोरपणे पाळला जातो.
 जेवणाच्या दिवशी घरच्या लक्ष्म्यांना सन्मान -
 जेवणाच्या दिवशी ब्राह्मण समाजात सवाष्णीला जेवणाचे निमंत्रण असते. तिला सन्मानाने जेवू घातले जाते. खणानारळाने ओटी भरतात. दक्षिणा देतात. अनेक ब्राह्मण घरांतून दोन सवाष्णी जेवणास आमंत्रित करतात. पैकी एक ब्राह्मण तर दुसरी मराठा वा माळी समाजातील असते. ती शेतकरी समाजातील म्हणून सन्मानित केली जाते. मराठा समाजातील स्त्री या सणासाठी सवाष्ण म्हणून जाण्यात सन्मान मानीत असे.
 मात्र ब्राह्मणेतर समाजात (सोनार, मराठा आदी) या दिवशी घरातील स्त्रिया प्रथम जेवतात. नंतर पुरुष जेवतात. कामाच्या रेट्यामुळे सर्व महिला आधी जेवू शकल्या नाहीत तर घरातील एक सून आधी जेवते. मग मुलेबाळे पुरुष जेवतात. लक्ष्म्या घरात आणताना अक्षत टाकीत आणतात. सवाष्णीला अक्षत टाकून कुंकू लावतात.
 सुगड्याचे मुखवटे तयार करण्याची रीत -
 खास काळी सुगडी आणून त्यावर बेलाची पाने घासून मऊ करतात. शिरगोळ्याच्या सहाणेवर हळकुंड उगाळून रंग तयार करतात. हिंगुळाचा लाल रंग घेतात. सुगड्यावर नाक डोळे काढून मुखवटा तयार करतात. त्याला सजवतात. एकावर एक चारपाच घागरी वा मडकी मांडून त्यावर मुखवटा बसवतात.

१८८
भूमी आणि स्त्री