पान:भूमी आणि स्त्री.pdf/१८९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

राशींची लक्ष्मी म्हणून पूजा केली जाते. एखाद्या मधल्या वा धाकट्या सुनेस लक्ष्म्या मांडण्याची इच्छा झाली तर तिच्या आईने लक्ष्म्या घेऊन मुलीकडे यायचे असते. आई नसेल तर वडील बहीण वा इतर कोणी मैत्रीण लक्ष्म्या देते.जी व्यक्ती लक्ष्म्या देते तिला आहेर केला जातो.
 मृगाच्या पावसात पेरलेले धान्य भाद्रपदात भराला येते. मूग, उडदाचे दाणे भरले जातात. परसबाग हिरव्या पालेभाज्यांनी, फुलांनी बहारून जाते. मातीची सुफलनशक्ती वाढून, उद्या घरा घरात येणाऱ्या धान्याचे पीक भरभरून यावे अशी शुभकामना व्यक्त करणारा हा सण. ही पूजा हरित लक्ष्मीची असते. म्हणूनच लक्ष्म्यांच्या समोर धान्याच्या राशी घालून त्यांची पूजा करतात. पूजणारी स्त्री आपले मन ओवीतून व्यक्त करते.

लक्ष्मी आई आली शेताच्या बांधासडी
सावळा बाळराजा हाती गोफण पाया पड़ी
माझ्या हे ग शेतात
हाल्या बैलाचं आऊत
माझ्या हे ग घरी
लक्ष्मी येती ग धावत

 लक्ष्मीचे आगमन आणि मांडणीतील विविधता -
 भाद्रपद सप्तमीला लक्ष्म्या बसवतात, अष्टमीला त्या जेवतात आणि नवमीला परततात. मराठवाड्यातील बहुतेक घरांतून मुखवटे असलेल्या उभ्या लक्ष्म्या मांडतात. मुखवटे घरांतील परंपरेनुसार वेगळे असतात. पण सर्वसाधारणपणे शाडूचे तयार मुखवटे असतात. काहींच्या घरी सुगडी रंगवून त्याचे मुखवटे तयार करतात. काही घरांत पितळेचे मुखवटे असतात. धडाची रचना कुलरीतीनुसार वा सोयीनुसार करतात. १. मडक्यांची उतरंड मांडून सर्वात वरच्या मडक्यावर मुखवटा मांडतात. २. घरातील डबे, घागरीचा वापर करून त्यावर मुखवटा ठेवतात. ३. अलीकडे पत्र्याचे साचे विकत मिळतात.

१८४
भूमी आणि स्त्री