अनुमरण या बाबी प्रतीकात्मक होत्या. पूर्व वैदिकांत सती प्रथा नव्हती. उत्तरोत्तर स्त्रीविषयीचे हीनत्वाचे उल्लेख वाढत गेले.
या परिवर्तनाच्या काळात 'ऋषिपंचमी' चे आजचे रूप स्थिर झाले असावे. नांगराचा शोध लागण्यापूर्वीचे स्त्री आणि शेती यांचे मूलभूत नाते या व्रतातून दृगोचर होते. आदिमकाळापासून स्त्री आणि निसर्ग यांच्यात निर्माण झालेला 'आदिबंध' किती मूलभूत आहे हे या व्रतातून लक्षात येते.
गौरी लक्ष्म्यांचा सण -
स्त्री सुपीकतेचे प्रतीक -
मानव शेती करू लागल्यावर त्याला जमिनीतील उत्पादन शक्ती आणि स्त्रीतील जननक्षमता यांत विलक्षण साम्य जाणवले. त्यामुळे स्त्रीत यातुशक्ती... एक गूढ शक्ती आहे असे त्याला वाटे. त्यातूनच स्त्रीविषयी भययुक्त आदराची भावना त्यांच्या मनांत... लोकसमूहाच्या मनात निर्माण झाली. स्त्रिया उत्पादनाचे काम करीत असत. शेतीचा, तृणधान्ये, कंदमुळे यांचा शोध त्यांनीच लावला. यांतून ती सुपीकतेचे प्रतीक बनली. धनधान्याची समृद्धी व्हावी म्हणून करावयाच्या कृतींमध्ये स्त्रियांना महत्त्वाचे स्थान असते. मराठवाड्यात बाजरीवर रोग पडला तर रजस्वला स्त्रीकडून शेताची पूजा करून घेण्याची प्रथा होती.
गौरी वा लक्ष्म्यांचा सण शेतीच्या समृद्धीसाठी -
महाराष्ट्रात हा सण अत्यन्त महत्त्वाचा मानतात. मराठवाड्यातील घराघरातून हा सण अत्यन्त श्रद्धेने साजरा होतो. मराठवाड्यातील सातही जिल्ह्यांतून सर्व जातिजमातींत हा सण पाळला जातो. मराठवाड्यात गौरींनाच लक्ष्म्या म्हणतात. भाद्रपद शुद्ध अष्टमीला त्या जेवतात, त्या दिवशी अनेक जिल्ह्यांतून जिल्हाधिकारी सार्वजनिक सुट्टी देतात. हा एक महत्त्वाचा कुळाचार आहे. सर्वसाधारणपणे ज्येष्ठ मुलाकाडे वा कर्त्या मुलाकडे लक्ष्म्या बसविण्याचा मान जातो. घरातील सर्व मुले व सुना या सणासाठी एकत्र जमतात. लक्ष्म्यांच्या सणाला सुना माहेरी जात नाहीत. एखाद्या मुलास लक्ष्म्यांना मूळ घरी येणे शक्य नसेल तर त्यांच्या घरी धान्याच्या
पान:भूमी आणि स्त्री.pdf/१८८
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
भूमी आणि स्त्री
१८३