Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/१८६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

स्त्रीला महत्त्वाचे स्थान होते. पुरुरव्याशी विशिष्ट अटींवर विवाह केलेल्या उर्वशीने आपल्या सासऱ्यास १०'मी तुम्हाला अन्न आणि वस्त्र पुरवीन' असे आश्वासन दिले होते. शेती करणे, वस्त्र विणणे, घट तयार करणे यात ती कुशल होती. भूमी सर्जनशील तशीच स्त्रीही सर्जनशील, मानवास जन्म देणारी, तसेच विविध वस्तूंच्या संगमातून नवनिर्मिती करणारी. सर्व उद्योग - कृषि, पशूंवर आधारित गृहोद्योग होते. ते स्त्रीने विकसित केले. तिचे तत्कालीन अर्थव्यवस्थेला महत्त्वाचे योगदान होते म्हणूनच सर्व प्राचीन देवता स्त्रीरूपी आहेत. झाडांचा आत्मा स्त्रीला नेहमीच आशीर्वाद देतो अशी Myth आहे. स्त्रीचे अधिकार नदीच्या माध्यमातून सांगितले गेले आहेत. तिला लोकमाता म्हटले जाते. शेतीची अर्थव्यवस्था हाच 'स्त्रीतत्त्वा'चा भौतिक पाया होता. समृद्धी, पीकपाणी, सुपीकता, मुलाबाळांची समृद्धी यांचे प्रतीक स्त्रीदेवता होत्या. दुर्गा ही निसर्ग आणि नवजीवनाचे प्रतीक. तर काली (लक्ष्मी) विपुलता, समृद्धी आणि ऐहिकतेचे प्रतीक. शक्ती ऊर्फ उमा ऊर्फ गौरी ही सर्व निर्मितीचे मूळ. सरस्वती ही बुद्धी आणि कलेची देवता. चंडीचे व्यक्तिमत्त्व उग्र विक्राळ. तीसुद्धा प्रिय देवता होती.
 स्त्रिया शारीरिकदृष्ट्या पुरुषांइतक्याच विकसित होत्या. त्या युद्धातही सहभागी होत. विश्पला ही स्त्री-सेनापती होती. त्या अधिक क्रूरपणे वागत. पुरुषांचे युद्धावर जाणे केवळ शारीरिक सुदृढतेमुळे नसून त्याकाळच्या आर्थिक गरजा मुख्यत्त्वे करून स्त्रिया भागवीत असल्याने त्यांना लढाईवर जाणे शक्य झाले नसावे असे बिफॉ या मानववंशशास्त्रज्ञास वाटते.
 वृषीपंचमी की ऋषिपंचमी -
 मोहंजोदारो आणि हरप्पा येथील ५ ते ७ हजार वर्षांपूर्वीची संस्कृती मातृसत्ताक होती. आर्यांची पितृसत्ताक जीवनव्यवस्था भारतात स्थिरावण्यापूर्वीची होती. या संस्कृतीचा आधार शेतीव्यवसाय होता. हा समाज लिंगपूजक होता. बैलांना - वृषभांना हा समाज पूज्य मानीत असे. वृषभाला ठेचून प्रजननासाठी निरूपयोगी करणे, त्याला शेतीला जुंपणे, गाडी ओढण्यास लावणे हे लिंगपूजेच्या विरुद्ध आहे. असे असले तरी सिंधू संस्कृतीत शेतीसाठी व्यापारासाठी बैलांचा उपयोग केला

भूमी आणि स्त्री
१८१