पान:भूमी आणि स्त्री.pdf/१८४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नाते सतत जाणवते. पोळ्याच्या दिवशी मराठवाड्यात सालदारांना, शेतात राबणाऱ्या गड्यांना, त्यांच्या लेकरांना, घरधनीण आग्रहपूर्वक जेवू घालते.
 श्रमाची प्रतिष्ठा -
 पोळ्याच्या सणाच्या निमित्ताने श्रमाची प्रतिष्ठा समाजमनात रुजवली जाते. श्रमाशिवाय शेती फुलत नाही. शेतात कष्ट करणाऱ्याचे जमिनीशी घामाचे नाते असते. जमीन जणु त्याच्याशी बोलते. जनावरांच्या डोळ्यांतील भाव, त्यांच्या हंबरण्यामागील सांगावा, शेतकऱ्याला, कष्टकऱ्याला समजतो. पाऊस पाणी चांगले असेल तर पोळ्याचा सण थाटात साजरा होतो. त्या निमित्ताने अनेक गावांत बैलगाडीच्या शर्यती असतात. मिरवणुकीत कोणाच्या बैलाचा मान पुढे राहायचा, यावरूनही भांडणे होतात. पाऊस पाणी फारसे बरे नसले तरी हा सण सुना जात नाही. कारण तो जमिनीच्या सुफलीकरणाशी, धनधान्य समृद्धीशी जोडलेला आहे. विवाह हा सुफलीकरणाचा पाया असल्याने गायबैलांचे लग्न लावले जाते. या दिवशी किमान पाच बैल पूजतात. लग्नासाठीची गाय एकच असते. ती घरोघर नेतात. विवाह ही संकल्पना केवळ सुफलीकरणाचे प्रतीक म्हणून येथे विधिरूपाने साजरी होते.
 या पूजेत पेरणीचे धान्य, पेरणी व शेतीची आवजारे, सूप, टोपली, विविध प्रकारची पाने, पानांची तोरणे, झाडांच्या फांद्या यांना महत्त्व असते. अंबाडीपासून निघणाऱ्या सेलम या धाग्याची सुतळी करून ती, जाते, मुसळ, दाराच्या कड्या, चूल, धान्याच्या कोठ्या आणि कणग्या यांना बांधतात. अबांडी वाढत जाणारी तिचा धागा लांबत जाणारा. जमीन, श्रम आणि पाणी यातून निर्माण होणारी सुफलता अशीच वाढत जावो असे यांतून सूचित होत असावे.
 मातीचे बैल कुंभार करतो. घरोघर देतो. त्यांचीही पूजा करतात. कुंभार हा गावगाड्यातील महत्त्वाचा बलुतेदार आहे. त्यालाही जेवणाचे आमंत्रण व वाढण असते. खेड्यांमध्ये हा विधी साजरा होतोच.
 आदिवासींचा पोळा -
 आदिवासी समाजातील अनेक सण आणि विधी पाऊस काळात आषाढ श्रावणात साजरे होतात. ते जमिनीतील सुफलनशक्तीशी जोडलेले असतात.

भूमी आणि स्त्री
१७९