आज आवतण घ्या
उद्या जेवायला या
असे आवतण देऊन त्यांना मानाने जेवायला बोलावतात. पोळ्याच्या दिवशी दाराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधतात. ज्वारीच्या पिठाची उकडून वा तळून कडोळी तयार करतात. ती बैलाच्या शिंगात अडकवतात. जू, फास, आळंद, टोपलं ही शेतीची अवजारे गेरू आणि चुन्याने कलात्मक रीतीने रंगवतात. बैलांची जिथे पूजा होते ती जागा शेणाने सारवून घेतात आणि रांगोळीचे झाड काढतात. जवळ भिंत असेल तर त्यावर झाड काढतात. घराला आंब्याच्या पानांचे धनदाट तोरण करून बांधण्याचा मान गावातील मांग समाजाच्या व्यक्तीस असे. तर काही ठिकाणी हा मान वारकाचा असे. त्या मोबदल्यात शेतकरी कुवतीनुसार धान्य देत असे. पोळ्याच्या दिवशी जेवणात पुरणपोळी असते. घरमालकीण बैलांच्या पायावर गरमपाणी दूध टाकून हळदकुंकू, अक्षता वाहून पूजा करते. मराठवाड्यात जेवणाचा कार्यक्रम काही ठिकाणी सायंकाळी असतो.
पोळ्याच्या दिवशी सालदार कष्टकऱ्यांना मिष्टान्न -
पुरणपोळीचा नैवेद्य कौतुकाने बैलांना भरवला जातो, तुपात बुडालेली पोळी बैलांच्या मुखात घालताना मालकीण जणु त्यांना सांगत असते, मनभरून, पोटभरून जेवा. तुमच्या मेहनतीतूनचं हे वैभव आम्हाला प्राप्त झाले आहे.
तूप दूध आणा ओता पोळ्यावरी
माझे राजे राबले लई सेतावरी
खारे माझ्या सोन्यांनो खारे माझ्या हिऱ्यांनो
प्वाट भरुदे तुमचं पुरनपोळ्यांनी......
या दिवशी शेतात काम करणाऱ्या सालदारांना सन्मानाने जेवायला बोलावले जाते. सकाळी बैलांना नदीला घेऊन जातात. त्यांना भरपूर पाण्याने स्वच्छ धुतात. त्यांच्या अंगावर कावेने ठसे उमटवतात. गळ्यात घुंगरमाळा घालतात. अंगावर देखण्या झुली घालतात. या झुलींना इन्द्रधनुषी रंगांचे भिंगाचे भरतकाम करून सजवले जाते. या दिवशी बैलांचा विवाह होतो. बाशिंग बांधून नवरदेव सजवला जातो. या दिवशी खेड्यातून वेशीला तोरण बांधतात. गावातील सर्व बैल मिरवत