Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/१७०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

स्त्री यांच्यातील एकरूपत्व मानवाने आदिम काळापासून स्वीकारले आहे. स्त्रीचे देहधर्म, स्त्रीच्या सुफलन प्रक्रियेतील संज्ञा - रजोदर्शन, पुष्पितावस्था, फलशोभन, ऋतू इत्यादी आहेत. पृथ्वीही रजस्वला झाल्याशिवाय सुफलित होत नाही अशी धारणा भारतीय संस्कृतीने आदिम काळापासून जोपासलेली आहे.
 ज्या काळात पृथ्वी रजस्वला होते त्याकाळात भूमी उकरीत नाहीत वा नांगरीतही नाहीत -
 अन्नाचे मूळ पाणी म्हणूनच जलतत्त्वाला जीवन म्हणतात 'वृष्टिमूलं कृषिः सर्वा वृष्टिमूलंच जीवनम्' ही जाणीव कृषिशास्त्रीय ग्रंथातून सतत राखली आहे. पहिला पाऊस पडून गेल्यावर पृथ्वी रजस्वला होते. स्त्रीच्या रजस्वला असण्याच्या काळात पुरुष समागम निषिद्ध मानला जातो. तद्वत भूमीच्या रजस्वल काळात भूमीचा लांगलाशी म्हणजे नांगराशी संबंध येता कामा नये. तसेच त्या काळात बीजवपन करू नये असेही सांगितले आहे. कृषिपराशर या कृषिग्रंथात पृथ्वीच्या रजस्वलावस्थेचा काळ मगृनक्षत्राची अखेर आणि आर्द्रा नक्षत्राची सुरुवात हा सांगितला आहे. त्याकाळाला अंबुवाची असे म्हणतात.
 पृथ्वीच्या रजोदर्शनाचा काळ त्या त्या प्रान्तातील कृषिपद्धतीनुसार वेगवेगळा असला तरी पृथ्वी रजस्वला.. आर्द्रा होण्याची संकल्पना मात्र सर्वत्र प्रचलित आहे. महाराष्ट्रात नागचौथीला स्त्रिया उपवास करतात. चौथ, पंचमी आणि सटीची कर या तीनही दिवशी औत हाकीत नाहीत, जमीन उकरीत नाहीत. या काळात चिरणे, कापणे या क्रिया वर्ज्य मानल्या आहेत. तसेच स्त्रिया झोक्यावर बसतात. किमान पाच झोके तरी घ्यायचेच असा रिवाज आहे. ओरिसात रजउत्सवात स्त्रिया पायांनी भूमीला स्पर्श करीत नाहीत. झोक्यावरच बसतात. तीन दिवस फळे खातात. तसेच गल्लीतील स्त्रिया एकत्र येऊन दिवसभर गाणी म्हणतात. खेळ खेळतात. महाराष्ट्रात भुलईतली फेराची गाणी, झोके यांमागील कल्पनाबंध लक्षात येतो. मराठवाडा परिसरातील अनेक वयोवृद्ध शेतकरी कुटुंबांना भेटून माहिती गोळा केली. या तीन दिवसांत जमीन उकरणे अशुभ मानले जाते. तिसऱ्या दिवशी भुलोबाची पूजा करतात. त्या संदर्भात पुढे टिपण जोडले आहे.

भूमी आणि स्त्री
१६५