Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/१६९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

किंवा जलाशयातून दिसून येतो. त्यामुळे त्यांचा संबंध पाणी, वीज, ढग यांच्याशी जोडला जातो. सर्पाचा आशीर्वाद लाभला तर सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा अनेक वर्षांपासून आहे. पुष्कळ ठिकाणी पिंपळाच्या झाडाखाली दगडात कोरलेल्या सर्पमूर्ती ठेवलेल्या आढळतात.
 भूकंपाचे कारण सर्प -
 भूकंपाचे कारण सर्पच आहे अशीही समजूत आहे. कारण सर्प हा पृथ्वीच्या चोहो बांजूनी विळखा घालून बसला आहे व तो हलला की भूकंप होतात अशी समजूत आहे. या संदर्भात १९९४ साली लातूर, उस्मानाबाद भूकंपाच्या वेळची आठवण. किल्लारी भागात भूकंपग्रस्तांच्या साहाय्यासाठी हिंडत असतानाचा अनुभव. या भागात द्राक्षांच्या बागा खूप असून मोठ्या प्रमाणावर कूपनलिका आहेत. भूकंपापूर्वी काही कूपनलिकांतून धूरही येत होता. त्याची फारशी दखल घेतली गेली नाही. किल्लारीच्या नीलकंठेश्वर मंदिराची पडझड पाहण्यास गेले असताना एक वयस्क बाई अत्यन्त त्राग्याने बोलल्या. "काय सांगावं ताई ? या धरणीमायन तरी किती सोसावं ? तिला भोकं पाडूपाडू पानी काढलं. ती एक सोशिक. तिनंतर तक्रार केली न्हाई. पन शेवटी तुमची मशिनं थेट शेषाच्या मस्तकाला भिडली. तो तर पुरुष. तो काय गप्प राहतो काय ? त्यान दाखवला इंगा. फणा हलवून सगळ्यांनाच मातीत गाडून टाकलं. पण वाईटांसोबत चांगलेही गाडले गेले हो!" साप हे पृथ्वीचे कारण मानले जाते. एक अशीही समजूत आहे की सापाने आकाशाला पृथ्वीपासून दूर केले. त्यात त्याचे तुकडे झाले. त्यातील एक भाग म्हणजे तारांगण. आकाशातील व्याधालाही सर्प मानतात. सर्प मरत नाहीत, म्हातारे होत नाहीत, ते कात टाकून तरूण होतात अशीही श्रद्धा आहे. सर्प संपत्तीचे रक्षण करतो जादूटोणा करतो अशीही समजूत आहे. नाग, सूर्य आणि अग्नीचे प्रतीक मानला जातो. युफरेट्समधल्या तोरोनियम लोकांच्यात सर्पपूजा प्रथम सुरू झाली व तेथून जगभर पसरली असे मत काही अभ्यासक मांडतात. प्राचीन काळी मध्य अमेरिकेत जिवंत सापांची पूजा केली जाई.
  महाराष्ट्रातील नागपंचमी सण आणि अंबुवाची -
 रसरंगगंधाच्या विविधतेने नटलेली अनेकविध वनस्पतींचा गर्भ वाहणारी पृथ्वी आणि नाना विचार-विकार संकल्प विकल्पांनी भारलेल्या मानवाचा गर्भ वाहणारी

१६४
भूमी आणि स्त्री