पान:भूमी आणि स्त्री.pdf/१६८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

विषारी करून टाकला होता. त्याच्याशी युद्ध खेळून त्याला नामोहरम करून कालियाला वठणीवर आणले. कालियाच्या फडेवर उभ्या राहिलेल्या कृष्णाला पाहून गोकुळातल्या लोकांना वाटले की डोहात बुडणाऱ्या कृष्णाला कालियाने वाचवले. त्यांनी कालियाला दूध पाजून त्याची पूजा केली. हा दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. म्हणून त्यास नागपंचमी म्हणू लागले व त्या दिवशी जिवंत नागाची हळद, कुंकू, केशर वाहून पूजा करण्याची पद्धत पडली.
 अशा विविध कथा नागपंचमीभोवती गुंफलेल्या असल्या तरी एकमात्र खरे की नागपूजा जगभर प्रचलित आहे. हजारो वर्षांपासून प्रचलित आहे.
  'सर्पबंध' अनेक संदर्भ' -
 नागमाता कद्रुही पृथ्वीचे प्रतीक असून तिची पूजा करावी असे शतपथ ब्राह्मण सांगते. केवळ नागाचीच पूजा का केली जाते याचा इतिहास सांगताना श्री. शरद जोगळेकर नोंदवितात की नऊ नागराजांची पूजा सायंकाळी व प्रातःकाळी अनेक हिंदू करतात. कारण त्यामुळे विषबाधा होत नाही व सर्व क्षेत्रांत विजय मिळतो. या व्रताची प्रार्थना पुढीलप्रमाणे आहे.

अनंत वासुकी शेषं पदमानभंच कंबलम,
शंखपालं धृतराष्ट्रं तक्षकं कालिया, तथा
एतानि नवनामानि, नागानांच महात्मना
सायंकाले पठेत् नित्यं प्रातःकाले विशेषतः
तस्य विषभयंनास्ति, सर्वत्र विजयी भवेत्।

 महाभारतात बलराम हा शेषाचा अवतार मानला आहे. रामायणामध्ये सुखा नावाच्या राक्षसीचे वर्णन आहे. ती नागमाता होती. सुप्रसिद्ध वैय्याकरणी पाणिनी याचाही नागराजाशी संबंध जोडला जातो. सारनाथाच्या स्तंभावर भगवान बुद्धांना भेटण्यास आलेल्या प्राण्यांत नागाचे चित्र आहे. चीनच्या सेनानीच्या झेंड्यावर इगनेचे चित्र असते. तिबेटच्या सुनाग नावाच्या राजाचा निवास पाटली नावाच्या सरोवरात असे अशी श्रद्धा आहे. जपान, इंडोनेशिया, कोरिया, कंबोडिया या देशांत सर्पपूजा होती. सरपटणाऱ्या जातीच्या सर्वांचा उगम आणि निवासडोंगर कपारीतून

भूमी आणि स्त्री
१६३