Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/१६२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहे. राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासाची प्रत्यक्ष नोंद असलेला ग्रंथ असे दाखवितो की काश्मीरचे राजे कर्कोटकाच्या वंशातले आहेत. केरळ प्रान्तातील प्रत्येक नायर हिंदूच्या घरी काऊस नावाचे छोटेस सर्प मंदिर असते. त्याची पूजा केल्यास घरात लक्ष्मी वास करते अशी श्रद्धा आहे. नाग हे त्यांचे कुलदैवत आहे. बंगालच्या काही भागांत नागमंडल हा नृत्य प्रकार प्रचलित आहे. तेथील वैद्य जातीचे लोक नागावतार शुभराय याच्या वंदनेसाठी हे नृत्य करतात. छत्तीसगडमध्ये श्रावण महिन्यात नागराजाची पूजा होते. कर्नाटकात नागपूजा करतात. पंजाबमध्ये सफदोन या गावी नागपूजा विशेष करून असते. जनमेजयाचे सर्पसत्र याच गावी झाले असे मानतात. महाराष्ट्रात नागपंचमी अत्यन्त उत्साहाने साजरी होते.
 महाराष्ट्रातील नागपूजा -
 महाराष्ट्रातील नागपंचमीचे नाते रोज रात्री गायिल्याजाणाऱ्या भुलईच्या गाण्यांशी, आकाशाला भिडणाऱ्या उंच झोक्यांशी, अठरापगड जातिजमातीच्या मैत्रिणीसह रानात जाऊन केलेल्या वारूळाच्या पूजेशी, ज्वारीच्या लाह्या आणि नागपूजेशी आहे.
 नागपंचमीचा भावबंध अतूटपणे जोडला आहे, माहेरपणाशी आणि भावाबहिणीतील प्रेमाशी. नागपंचमीसाठी माहेरचा मुऱ्हाळी न्यायला येतो. त्याची वाट पाहणारी बहीण म्हणते.

पंचमीचा सण नागोबा वेगीला
मुऱ्हाळी यावा मला पाठी भाऊ मागितला...
वेडा बागडा भाऊ बहिणीला असावा
चार आण्याची चोळी, एका रात्रीचा विसावा....

 नागपंचमीला माहेरवाशिणीस बांगड्या चढविण्याची पद्धत आहे. नागपंचमी .. येण्यापूर्वी दुपारी वा रात्री गल्लीतील, वाडीतील महिला भुलई खेळण्यास एकत्र येतात. फेरात भुलईची गाणी उंच किनाऱ्या आवाजात गातात. पंचमीच्या निमित्ताने अनेक फेरावरची कथागीते गायिली जातात. ही गीते स्त्रीजीवनातील विविध भावबंध उकलणारी असतात.

भूमी आणि स्त्री
१५७