Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/१५४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तिफण घेऊन जातो. तिफणीची डागडुजी करून तिला उत्तम रीतीने पेरणी करण्यास योग्य करण्याचे काम सुताराचे. सुतारही या कामात गर्क असतात. पेरणीपूर्वी सुताराला गंधाक्षता लावून त्याचा सन्मान केला जातो. सुताराचे घर म्हणजे जणु तिफणीचे.... कुरीचे माहेरच असते.
 पेरणीचे दिवसांत सुताराला रात्रंदिवस काम असते. त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करताना शेतात राबणारी शेतकरीण म्हणते,

सुतार मेटावरी दिवा लावूनी काय केले ?
ताईता बंधूजींनी चाड सोन्याचे घडविले

 सुतार हा पांढरीतला महत्त्वाचा बलुतेदार. बलुतेदारापैकी अनेक जण कलाकारही आहेत. त्या कलेची कदर शेतकरी समाजाला होती.

सुतारीणबाई कुठे गेला तुझा दीर
भाऊच्या चाड्यावरी काढीले कीर मोर
सुतारीण बाई कुठे गेला तुझा पती ?
भाऊच्या चाड्यावर कुणी काढीला गणपती ?

 तिफणीच्या चाडातून बियाणे व्यवस्थित खाली पडते की नाही याची चाचणी सुतार करतो. अवघ्या मानवसमूहाचे जगणे धनधान्याच्या निर्मितीवर अवलंबून असते. कृषि समृद्धीवर अवलंबून असते. धान्यनिर्मितीत सुताराचा महत्त्वाचा सहभाग असो.
 तिफणीला नवरी बनवून शेतात नेले जाते -
 सुताराचे घर तिफणीचे माहेर. तिथून तिफणीला नवरी बनवून शेतात नेले जाते. पाऊस पडताच कुरीबाईला... तिफणीला चिठ्ठी पाठवून, मुऱ्हाळी पाठवून सन्मानाने बोलावले जाते. शेतकरणीचा बंधू वा पुत्र मुऱ्हाळी म्हणून पाठविला जातो.

पडतो पाऊस चिमणीबाईचा गलबला
धरतीबाईचा कंथ आला
सुताराच्या भेटावरी टिपणीबाईचे माहेर
राजसबाळ माझा मुऱ्हाळी झाला स्वार

भूमी आणि स्त्री
१४९