Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/१५२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

परंतु पावसाचे पाणी उदरात आकंठ साठवून घेण्याची क्षमता पुनः पुन्हा वाढत राहते. त्या पाण्याचे बळ वर्षाऋतू संपल्यानंतरही भूमी सर्जनासाठी पुरवते.
 सूर्यऊर्जेशी जोडलेले व्रतोत्सव : मार्गशीर्ष ते वैशाख मासांत -
 सूर्याची उष्णता मार्गशीर्ष, पौष महिन्यापासून वाढत जाते.थंडीचाही जोर वाढतो. सूर्याच्या शक्तीची जगण्यासाठी असणारी गरज जाणवत जाते. त्याची नोंद आदिमानवाने घेतली. सूर्य, भूमी यांच्या संयोगातून सर्जनाला मिळणाऱ्या ऊर्जेशी जोडलेले सण, विधी, व्रते, उत्सव, हे मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन, चैत्र, वैशाखात येतात. उदा. चंपाषष्ठी, धुंदुर्मास, शाकंभरी नवरात्र, देवदिवाळी, पौर्णिमा, मकरसंक्रांत, भोगी, होळी, रंगपंचमी, धुळवड, वसंतपंचमी, गुढीपाडवा, चैत्र नवरात्र, बैसाखी, अक्षय्य तृतीया, इत्यादी.
 वर्षन - भूमी - सर्जन -
 या प्रकरणात वर्षन आणि भूमीच्या संयोगातून निर्माण होणाऱ्या सर्जनाशी जोडलेल्या महत्त्वाच्या व्रतोत्सवसण विधींचा वतत्सबंधी लोकगीतांचा शोधघेण्याचा प्रयत्न केला आहे. ज्येष्ठात दक्षिणेतून येणाऱ्या मृदगंधी वाऱ्याचे भोवरे आसमंतात भरारू लागतात. वावटळींचे फेरे धावू लागतात. जणु येणाऱ्या पावसाची चाहूल भूमीला लागते. उन्हाने शुष्क झालेल्या झाडांच्या मनात आशा पालवतात. अशा काळात वृक्षांची पूजा सामूहिकपणे बांधण्याची चाल पुरातन असावी. आजही वटवृक्षाची पूजा सामूहिकपणे केलीजाते. काळाच्या ओघात त्या कथेला काळानुरूप कथांची पुटे चढविली गेली असतील. मुळात ती वर्षनाच्या स्वागताची पूजा आहे.
 वृक्षपूजा : समृद्धीसाठीचा यातुविधी -
 वटवृक्षाच्या पारंब्या जमिनीत घुसतात, तेथून नवे झाड उगवते. झाडांची मुळे पावसाचे पाणी साठवून ठेवतात. पारंब्या अत्यन्त उपयुक्त असतात. त्या आमच्या लोकजीवनात घट्ट रूजून गेल्या आहेत. सूरपारंब्यांचा खेळ अजून खेड्यांत लोकप्रिय आहे. वटवृक्ष पुरातनतेचे, विशालतेचे , सुरक्षिततेचे प्रतीक आहे. वावटळींना अडविण्याचे काम हा घेरदार वृक्ष करीत असतो. या वटवृक्षाची पूजा ज्येष्ठात तर, बाभळींची वा रानातल्या झाडांची पूजा आषाढात करतात. आषाढ तळण्याची खास प्रथा मराठवाड्यात आहे. कोंडोळी, गोड भजी... गुलगुले तळून 'आषाढ तळला आहे, खायला या' असे निमंत्रण दिले जाते. आषाढातील झाडांची

भूमी आणि स्त्री
१४७