Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/१५१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मानवी संस्कृतीचा विकास होत गेला. मानवाच्या कल्पनासृष्टीत त्या कल्पनांतून निर्माण झालेल्या दैवतविषयक कल्पनात, सृष्टीचे प्रतिबिंब उमटले आहे. या निरीक्षणातून त्याने विधी, उत्सव, सण, व्रते, यांची रचना केली, परंपरा निर्माण केल्या. तत्संबंधी गीतांतून आपले, निसर्गाचे आणि जीवनातील सुखःदुखांचे भौतिक व भावनिक नाते प्रगट केले.
 प्रारंभीच्या काळातील मानवी जीवन अन्नम्हणजेच जगणे या कृतीशी बांधलेले होते. प्राथमिक कृषिपद्धतीतून मानवाची यातुप्रधानजीवनपद्धती विकसित झाली. त्या त्या लोकसमूहाचे दैवत विकल्पन आणि तत्त्वचिंतन यांचा, त्या त्या लोक समूहाच्या सामाजिक आर्थिक जीवनाशी आंतारिक व अतूट अनुबंध असतो.
 सण व्रतोत्सव आणि आजचा धर्म -
 नागपंचमी, नारळी पौर्णिमा, पोळा, घटस्थापना , गौरीगणपती, हरितालिका, चंपाषष्ठी, सटीचे नवरात्र, चैत्रगौर, पौषातील रविवारचे व्रत इत्यादी व्रतोत्सवांचे - विशेषकरून स्त्रिया करीत असलेल्या व्रतोत्सवांचे निरीक्षण केल्यास असे लक्षात येते की, आज ज्या धर्माशी त्यांचे नाते जोडले जाते त्या धर्माशी त्यांचा काहीही संबंध नाही. आज अस्तित्वात असलेला धर्म सुघटित होण्यापूर्वीच्या प्राथमिक कृषिप्रधान जीवनपद्धतीशी तेजोडलेले आहेत. त्या काळच्या यातुप्रधान विधियुक्त जीवनपद्धतीतून ते कालौघात निर्माण झाले. तत्कालीन बहुजनांच्या जीवन जगण्याचा एक भाग बनले. ज्यांना आदिबंध म्हणता येईल अशा स्वरूपात ते भारतीयांच्या जीवन पद्धतीत गोंदले गेले. काळानुरूप सामाजिक, राजकीय धार्मिक बदलांबरोबर त्यांचे उन्नयन झाले. तेव्हाचेस्वरूपबदलून आजच्या रूपात परिवर्तन झाले.
 वर्षाकाळाशी जोडलेले व्रतोत्सव : ज्येष्ठ ते कार्तिक मासांत -
 या कृषिसंबंद्ध विधिउत्सव सण व्रतांचा शोध घेताना असे लक्षात येते की, वर्षन आणि भूमी यांच्या संयोगातून बहराला येणाऱ्या सर्जनाशी जोडलेले विधी, उत्सव, सण, व्रते ही ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन कार्तिक या महिन्यांतून विशेषत्वाने येतात. सूर्य, भूमी यांच्या संयोगातून सर्जनाला चेतना मिळते. याची जाण आदिमानवाला निरीक्षणातून झाली होती. सूर्याची ऊर्जा भूमी आपल्या उदरात साठवून घेते. त्यामुळे मातीची फलित होण्याची शक्ती तर आधिक वाढतेच

१४६
भूमी आणि स्त्री