Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/१५०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 पाऊस आणि भूमी : सूर्य आणि भूमी यांच्यातील नाते -
 भारतातील बहुतेक सण व्रते, विधी, उत्सव हे कृषिजीवनाशी जोडलेले आहेत. आणि ते मूलतः जमिनीची सुफलनशक्ती वाढावी, जीवन सर्वार्थाने सुखकर व समृद्ध व्हावे या मूलभूत मानवी जाणीवेतून निर्माण झाले आहेत. एकूण जीवनचक्र सुरळीतपणे प्रवाही राहावे यासाठी अन्नवपाणी यांची प्राण्यांना गरज असते. त्यानंतर वस्त्र आणि निवारा यांचे महत्त्व. अन्न निर्माण करते भूमी. पाणी देते आभाळ. या दोहोंच्या जोडीला निर्मितीसाठी वा सर्जनासाठी आवश्यक असते ऊर्जा. ती सूर्यापासून मिळते. निसर्गाचे चक्र सतत फिरत असते. त्याचे निरीक्षण मानवाने हजारो..लाखो वर्षांपासून केले. त्या निरीक्षणातून त्याने निसर्गातील घडामोडीबद्दल काही ठोकताळे बांधले.या निरीक्षणातून त्याला वर्षन- भूमी- सर्जन तसेच सूर्यभूमी - सर्जन यांच्यातील अनुबंध उलगडला गेला.
 भूमी ही जणू विश्वाचा..जगाचा गर्भाशय आहे. बीज पेरणारा सूर्य असतो. वर्षन झाले नाही तर बीज कोरडे राहते. भूमीचा गर्भाशय वांझ राहतो. वर्षन, भूमी आणि सूर्य यांच्या समागमातून वनस्पतीसृष्टी निर्माण होते. या तिहींतील कार्यकारणभाव समजून घेण्याचा प्रयत्न आदिकाळापासून मानवाने केला. कोणत्या काळात विशिष्ट वनस्पतींची वाढ जोमाने होते, वनस्पतींचे रूप, रंग, स्पर्श,गंध, चव यांच्यात बदल कसे घडतात. इत्यादीबाबतचे बारकावे, निरीक्षणांतून त्याने नोंदवून घेतले. जमिनीची सुफलता कोणत्या काळात भराला पोहोचलेली असते. कोणत्या काळात वाढते या बाबतचे आडाखे त्याने बांधले. अवघे जीवन अन्नावर आधारित असल्याने जमिनीच्या सुफलन शक्तीशी जोडलेले विविध प्रकारचे यातु विधी त्याने रचले. त्या यातुविधींचे परिणाम अजमावून ते विधी निश्चित केले. त्यातून जमिनीच्या सुफलनतेशी निगडित परंपरा निर्माण झाल्या.
 मानवी संस्कृतीच्या विकासाची दिशा -
 सुरुवातीच्या काळात सर्जन ही विश्वातील एक अनाकलनीय, गूढ पण जगण्यासाठी आवश्यक आणि निसर्गनियमानुसार घडणारी घटना होती. वर्षानुवर्षांच्या अव्याहत निरीक्षणांतून मानवाने भूमी आणि स्त्री यांच्यातील सर्जनक्षमतेचे सारखेपण बुद्धीत नोंदवले. भौतिक विश्वातील घटना आणि मानवाचा आत्मिक आणि बौद्धिक विकासयांचा परस्परांवर सतत परिणाम होत असतो त्यातून

भूमी आणि स्त्री
१४५