भोंडल्याच्या गाण्यांची : झिम्म्याची लय -
भोंडला वा हादग्याची गाणी टाळ्यांच्या तालावर झिम्म्याच्या अंगानी खेळली जातात. टिपऱ्यांचा वापर केला जात नाही. तसेच चालीमध्ये विविधता आणि वेग आहे. ती भुलाबाईच्या गाण्यांसारखी संथ नाहीत. ही गाणी झिम्म्याच्या पद्धतीने गायिली जातात. एकमेकींकडे तोंड करून व दुहेरी फेरातही गाणी गायिली जातात. ही गाणी केरव्याच्या लयीत आहेत.
संगीताच्या भाषेत बोलायचे तर भुलाबाईची गाणी ठाय लयीत असून त्यांची मूळ प्रकृतीच अत्यंत संथ आणि गंभीर आहे.
भुलाबाईची गाणी ज्या प्रदेशांत गायिली जातात तो प्रदेश पश्चिम महाराष्ट्राच्या मानाने मागास राहिला. या भागावर सतत आक्रमणे होत. खानदेश हे महाराष्ट्राचे उत्तरद्वारच होते. सततच्या लढाया, परकीय राजवटींचा अंमल यामुळे हे उत्सव साजरे करताना गेल्या ३-४ शतकांत फारसा मोकळेपणा मिळाला नाही आणि त्यामुळे मोकळेपणातून निर्माण होणारी विविधता, मुक्त चंचलतेचा स्पर्श यापासून ही गाणी दूर राहिली. ग्रामीण भागातील स्त्रियांनी ही गाणी मूळ लयी सुरांसह जपली. नमनगीतातील अतिशय संथ आणि गंभीर लय, सुरांमधील एकसुरीपणा त्यांच्या प्राचीनतत्वाचे गमक आहेत.
भोंडल्याची गाणी : शिवकाळातील आश्वासक वातावरण -
हादगा हा भोंडला उत्सव सांगली, सातारा, पुणे, कोकण या भागात साजरा केला जातो. कोकणात गौरीचा सण अत्यंत थाटात आणि घराघरांतून साजरा होतो. गौरी गणपती पाठोपाठ येतात. स्त्री, पुरुष या दोन्ही ऊत्सवांत पूर्णपणे सहभागी होतात.या सणांना सामूहिक उत्सवाचे रूप आहे. गौरीच्या सणांची गाणी घाटावरच्या हादगा भोंडल्यात शिरली असावीत. श्रीमती दुर्गा भागवत हे मत व्यक्त करतात. झिम्मा हा नृत्यखेळ, जो महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैशिष्ट्य आहे, तोही कोकणांतून देशावर आला असावा. झिम्मा खेळताना जे पूर्वसूत्र गायले जाते. त्यातील संदर्भ बोलका आहे.
आंबा पिकतो रस गळतो
कोकणाचा राजा माझा , झिम्मा खेळतो..
झिम्म्याच्या उडत्या तालावर म्हटली जाणारी अनेक गाणी भोंडल्यात आणि तिथून काही गाणी भुलाबाईत दाखल झाली असावीत.