पान:भूमी आणि स्त्री.pdf/१४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांतून मार्गशीर्ष अमावास्येस 'इळाआवस' शेतात जाऊन साजरी करतात. परंतु ही पूजा औरंगाबाद, परभणी, जालना, नांदेड या परिसरात होत नाही. परभणी परिसरात तिला 'इरवण आवस' म्हणतात. या दिवशी शेतीच्या अवजारांना धार लावतात. उमरगा परिसरात 'पोळा' आषाढ अमावास्येस करतात. उर्वरित मराठवाड्यात श्रावण अमावास्येस पोळा, बैलांच्या सन्मानाचा सण साजरा होतो. परभणी, जालना, नांदेड, औरंगाबाद परिसरास भेटी दिल्या. औरंगाबादहून फुलंब्री, सोयगावकडे जाताना आणि कन्नडच्या भागात अहिराणी भाषेचा गंध मराठवाडी भाषेस येऊ लागतो. हेल बदलतात. कन्नडमधील काही घरांतून भुलाबाई मांडली जाते. ही घरे सुमारे ५० ते ६० वर्षांपूर्वी या भागात स्थलांतरित झाली आहेत. हिंगोली, सेलू भाग विदर्भाच्या जवळचा. त्या परिसरात भुलाबाई मांडली व खेळली जाते. उदगीर, उमरगा, औरादशाहजानी, निलंगा या भागांतील मराठवाडी भाषेवर कन्नड, तेलगूचा परिणाम झालेला आहे. तीनही भाषांचे हेल एकमेकांत मिसळले आहेत. जमिनीच्या सुफलीकरणाशी जोडलेले महत्त्वाचे उत्सव म्हणजे लक्ष्म्या, नवरात्र,दिवाळी, संक्रान्त, गुढीपाडवा, होळी इत्यादी. ते सर्वच मराठवाड्यात साजरे होतात. या व्यतिरिक्त योगेश्वरी, तुळजाभवानीचे नवरात्र, खंडोबाचा षड् रात्रोत्सव, शाकंभरीचे नवरात्र अनेक घरांतून कुळाचार म्हणून मांडले जाते.
 लक्ष्म्यांचा सण 'कुळाचार' म्हणून सर्व जातिजमातींतून श्रद्धापूर्वक मांडला जातो. मांग समाजात उभ्या लक्ष्म्या मांडतात. महार समाज गेल्या काही वर्षांपासून लक्ष्म्या मांडीत नाही. शेती हा प्रमुख व्यवसाय असणान्या घरातून मात्र, स्त्रिया धान्याच्या राशी मांडून पूजा करतात. कोल्हापूर, रत्नागिरी परिसरात खड्यांच्या किंवा तेरड्याच्या झाडांच्या लक्ष्म्या मांडतात. मात्र त्यांना 'गौरी' म्हणतात. लक्ष्म्या वा गौरीच्या मांडणीत विविधता असली तरी मूळ हेतू धान्य लक्ष्मीच्या पूजेचा, भूमीच्या सुफलीकरणाचा आहे. ओव्या, गाणी खूप मिळाली. विदर्भात खानदेशात लक्ष्म्या मांडतात. परंतु खानदेशात लक्ष्म्यांपेक्षा 'कानबाई' फार मोठ्या प्रमाणात, अत्यन्त थाटात बसवली जाते. मराठवाड्यात लक्ष्म्या विधिपूर्वक काटेकोरपणे बसविल्या जातात. तीच विधिपूर्वकता आणि काटेकोरपणा कानबाईच्या मांडणीत असतो.

भूमी आणि स्त्री