Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/१३८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जीवनातली सौंदर्यदृष्टी गेल्या काही दशकांत हरवत चालली आहे का? राजस्थानात गणगौरीची सजावट वा आंध्रातील बदकम्माची सजावट पारंपरिक अंगाने केली जाते. परंतु तिच्यातील ताजेपणा आजही टिकून आहे. आम्ही दारापुढे रोज जी रांगोळी काढतो, ती केवळ रीत म्हणून. दोन रेषा देवांच्या नावाने ओढायच्या इतकेच. परंतु आंध्र कर्नाटक वा तामिळनाडूत सकाळी अंगण अक्षरशः नाजूकपणे नटूनथटून बसते. अंगणाचे देखणेपण डोळ्यात मावत नाही. त्यामुळेच आजही या प्रदेशातील रांगोळ्यांनी स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व टिकवले आहे. त्यात नावीन्य सहजपणे भरले आहे. दिवाळी दसरा आदी सणांना महाराष्ट्रात नवनवीन रांगोळ्या काढतात. पण सकाळी सजणारे अंगण हरवत चाललेय असे भासते.
 रंगवल्ली : एककला -
 भोंडला मुलाबाई या उत्सवातं रांगोळीला असलेले महत्त्व लक्षात घेता रंगवल्ली या पुरातन कलेबाबत थोडा विचार केल्यास वावगे होणार नाही.
 रंगवल्ली ही एक चौसष्ट कलांपैकी महत्त्वाची कला आहे. ती केव्हा अस्तित्वात आली हे सांगणे कठीण असले तरी तिचा उगम धर्माच्या अनुबंधाने झाला असावा. ती मूर्तिकला वा चित्रकलेच्याही आधीची आहे असे मानले जाते. कोणत्याही धार्मिक वा मांगलिक कृत्यात रंगवल्ली ही आवश्यक आणि प्राथमिक गोष्ट आहे आणि ही प्रथा भारतभर आहे. दैनंदिन जीवनातसडा संमार्जनानंतर अंगणात रांगोळी शुभंकर लक्षण म्हणून रेखली जाते. आजकाल मूलतः भोजनाची तृप्ती वाढावी म्हणून वातावरण निर्मितीचा एक भाग म्हणून रांगोळी काढली जात असली तरी रांगोळीमागची भूमिका वेगळी होती. अतिथीला देव मानून त्याची देवासमान यथोचित पूजा करण्याचा अवशेषरूप भाग समाजाने कायम टिकविला आहे. सौंदर्याचा साक्षात्कार आणि मांगल्याची सिद्धी हे रंगवल्लीचे महत्त्वाचे उद्देश आहेत. प्रतीके हा रांगोळ्यांचा आधार आहे. रांगोळी ही जणू सांकेतिक भाषाच होती. स्वस्तिक, सूर्य, चंद्र, नागयुग्म अशा आकृती विविध भावबंध भाग दर्शविणाऱ्या असतात. रंगवल्लीसाठी तांदळाचे पीठ, गारगोटीचे पीठ यांचा वापर केला जातो. मात्र रांगोळी केवळ पांढऱ्या रंगाने काढणे अशुभ मानले जाते. त्यात गुलाल वा कुंकवाचा वापर आवश्यक असतो.

भूमी आणि स्त्री
१३३