भोंडला वा हादगा मांडताना पाटावर रांगोळीचा हत्ती काढून त्याभोवती रांगोळीची सजावट करतात. फुलापानांचीही सजावट केली जाते. हत्तीच्या खाली पहिल्या दिवशी रांगोळीचा एक ठिपका देतात. रोज एक ठिपका वाढवतात.मी लहान असताना पुण्याहून बदली झालेल्या मैत्रिणीकडे आम्हाला भोंडला खेळायला बोलवीत. त्यांच्याकडे मूगडाळ व तांदळाचा हत्ती मांडीत असत असे मला स्मरते. भुलाबाई घरी येण्यापूर्वी कोनाडा मखराने सजवीत. पुठ्याचे वळणदार मखर कापून त्यावर गुलाबी कागदाची फुले आणि हिरव्या कागदाची पाने चिटकवीत. भुलाबाईची मांडणी करताना कोवळी कणसे, धान्याची ताटे, फळे यांच्या माळांचा उपयोग केला जाई. मखराला फुलवरा बांधत.
सांझी उर्फ संजाबाईची सजावट -
मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशात सांझी मांडताना अशीच विविधरंगी सजावट केली जाते. हिरवेगार शेण घेऊन ते मातीत कालवून त्यापासून विविध लोकप्रिय आकार भिंतीवर चितारले जातात. त्यावर फुलांच्या पाकळ्या, बेगडाचे झगमगीत कागद चिटकवून सजावट केली जाते. सांझी उर्फ संजाबाई (संध्या हा मूळ शब्द - आसावा) हा कुमारिकांचा उत्सव आश्विन प्रतिपदेस सजावई म्हणजेच महाराष्ट्रातील कालगणनेनुसार भाद्रपद कृष्ण प्रतिपदेस सुरू होतो. महाराष्ट्रात भुलाबाई याच दिवशी मांडतात.
सांझी विविध पारंपरिक आकृत्यांनी सजविली जाते. या सजावटीला साझी का खिल जाना असे म्हटले जाते. रोज नवनवी आकृती मांडली जाते.
त्यामुळे लहान लहान मुलींना रंगसंगती तसेच रंगरेखांचे ज्ञान होऊन त्यांतील सौंदर्याची जाणीव होते. मुली आपापल्या प्रतिभेनुसार रोज सांझीला नवनवीन रीतीने सजवतात. त्यांच्यात चढाओढ लागते.
भुलाबाईचे मखर सुंदर रीतीने सजवण्यातही अशीच चढाओढ लागते. परंतु सांझीच्या सजावटीतील जिवंतपणा भुलाबाईच्या सजावटीतून हरवलेला दिसतो. एकदा का मखर मढवले की संपले. भोंडल्याभोवती रांगोळ्या काढतात पण त्यात पारंपरिकता असते. नवीनता किंवा अुन्मेष नसतो. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक