पान:भूमी आणि स्त्री.pdf/१३६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गाण्यांतून अवशेष स्वरूपात सापडते. विविध कालखंडातून प्रवास करताना त्या स्वरसमूहात शब्दांची वीण जुळवली गेली. शब्दांच्या माध्यमातून काळानुरूप अर्थ त्या स्वरांत भरले गेले. काळाच्या ओघात ते शब्द अर्थ उसवले गेले वा विस्कटले गेले तरीही त्या स्वरसंघाचा मूळ सांगाडा विशेष करून, त्यातील समूहमनाची आणि समूह गानाची मंत्रात्मकता प्राचीनत्वाची साक्ष देत आजही मागे उरली आहे. त्या स्वरसमूहांशी संबंधित असलेले विधिस्वरूप बदलत गेले तरी, त्यांच्याशी जोडलेले आस्तित्त्व दाखवीत क्षीणपणे टिकून आहे.
 भाद्रपद-आश्विनातील कुमारिकांचे उत्सव आणि त्यांतील कलात्मक आविष्कार -
 भोंडला मुलाबाईशी समान्तर असणारे मध्य प्रदेशातील सांझी, गुजरातेतील नवरात्र, कर्नाटक - आंध्रातील कोलवू आणि बदकम्मा या कुमारिकांच्या उत्सवांत फुलापानांची सजावट आणि फेरातील नृत्यगाणी हेस्वरूप असते. विदर्भातील भराडी - गौरमांडताना फुलांचे विविध आकाराचे झेले कलात्मक रीतीने सजवतात.श्रावणांत जिवतीच्या दुसऱ्या दिवशी या गौरीची स्थापना होते तर ललितापंचमीस विसर्जन केले जाते. या उत्सवाची गाणी भुलाबाईच्या गाण्यांशी खूप साम्य असणारी आहेत.
 उदा.-

 भराडी गौर
 

अंगणी दूध तापे त्यावर पिवळी साय
गवराई बाई लेकी .... राहून जाय....

 भुलाबाई
 

आंचे दूध तापे त्यावर पिवळी साय
लेकी भुलाबाई साखळ्या लेऊन जाय

 भराडी गौर
 
 
 

अरडी परडी घसरडा
परडीएवढ फूल वो
तेही फुल तोडाना
गौराबाई गुंफाना

 भुलाबाई
 
 
 

अरडीएवढी परडी ग
दारी मूल कोण ग
दारी मूल सासरा ग
सासऱ्यान काय आणलन् ग...

भूमी आणि स्त्री
१३१