पान:भूमी आणि स्त्री.pdf/१३५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 उदा. कन्या सासुरासी जाये, मागे परतोनी पाहे
  तैसे झाले माझ्या जिवा, केव्हा भेटसी केशवा - तुकाराम
  माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तिरी - जनाबाई
 या गीतातील स्त्री बगळ्याला दूध देते. त्याचेकडून पंख घेते. पंख राजाला देते आणि त्याच्या कडून घोडे घेते. दूध हे गाईचे सत्त्व. तर पंख हे बगळ्याचे सत्त्व आणि उत्तम घोडे हे राजाच्या मर्मस्थानापैकी एक. हे घोडे ती बापाला देते त्याच्याकडून साडी घेऊन ती आईला देते. तिच्याकडून चोळ्या शिवून घेते नि त्या बहिणीला देते, त्या बदल्यात भातकुल घेऊन ते भातकुल भावाला देते आणि त्याच्याकडून गोंडे घेते. हे गोंडे घेऊन ती सासरी जाऊ असे म्हणते. इतक्या परिश्रमाने गोंडे घेऊनसासरी जातानाही सासरबद्दल विश्वास नाही. सासर आणि माहेर या विषयीची तिची प्रतिक्रिया अशी,

सासरच्या वाटे कुचूकुचू काटे
माहेरीच्या वाटे गुलालाबुक्का वाटे

या ओळी म्हणजे हजारो वर्षांच्या संसारयात्रेबद्दल स्त्री मनाने तटस्थपणे नोंदवलेली प्रतिक्रिया आहे.
 स्त्री जणू एक गोंडा. गोंडा कशाचे प्रतीक ? समृद्धीचे की शृंगारकेंद्री जीवनाचे ? एक म्हण या ठिकाणी आठवते.

लेक गेली तर नाकाचा शेंडा गेला
बायको गेली तर पायताणाचा गोंडा गेला

 भोंडलाभुलाबाईची अनेक गाणी आहेत. त्यातील काही गाण्यांचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला आहे. भोंडला भुलाबाईच्या गाण्यांतून सासरबद्दल नवविवाहित आणि कुमारी मुलींच्या मनात असलेल्या भावना विपुल प्रमाणात व्यक्त होताना दिसतात.
 स्वरसमूहांचे आणि त्यांच्याशी जोडलेल्या विधिस्वरूपाचे प्राचीनत्व -
 वेदपूर्वकाळांत निसर्गातील निर्मितीतत्त्वांची पूजा करताना किंवा धनधान्य निर्मितीसाठी त्या तत्त्वांची कृपा व्हावी यासाठी विधियुक्त आराधना करताना म्हटल्या जाणाऱ्या स्वरसंघाचे बदलत आलेले रूप आजच्या भोंडला भुलाबाईचा

१३०
भूमी आणि स्त्री