Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/१२६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तिच्याशी पुरुषसंबंध निषिद्ध मानला आहे. गर्भिणी स्त्री व नाग यांची नुसती दृष्टादृष्ट झाली तरी निषेधभंगाच्या अपराधामुळे त्याची दृष्टी जाते व ती स्त्री प्रसूत झाल्यावर तिच्या न्हाणीतल्या पाण्याच्या स्पर्शाने त्याला पुनःदृष्टी प्राप्त होते. हा कल्पनाबंध सर्वत्र प्रचलित आहे. नागसर्प व पुरुष यांची एकरूपता आणि पृथ्वी व स्त्री यांची एकरूपता ध्यानी घेता स्त्रीरूप पृथ्वीच्या रजोद्रव्यात पुरुषरूप नागाचा संपर्क टाळण्याचे सामर्थ्य आहे, ही यातुगर्भ धारणा दृढावणे अगदी स्वाभाविक ठरते. दूधात अंबरस मिसळून ते रक्तवर्णी पेय पिण्याची कल्पना ही प्रतीकात्मक रजोद्रव्याचे पान करण्याची कल्पना आहे. त्यामुळे सर्प दंशाचे भय उरणार नाही अशी या क्रियेमागील मानसिक बैठक आहे. सर्प आणि आंबा यांच्या साहचार्याचा अनुबंध वरीलयातुकल्पनेतून या गीतात दाखल झाला असावा.
 राणूबाई : रण्णा सण्णा -
 'चिंचेखालची राणूबाई'११ असा उल्लेख येतो. राणूबाई ही अग्निदेवता, सूर्यदेवता आहे. ऋग्वेदात रण्णा सण्णा देवीचे वर्णन आले आहे. कहाणी वाङ्मयातही आदित्यराणूबाईची कथा येते. भुलाबाई खानदेशांतही मांडली जाते. खानदेश, बागलाणात कानबाई या देवतेची पूजा केली जाते. 'कानबाई' देवता खानदेशातील सुप्रसिद्ध संशोधक श्री. भा. रं. कुलकर्णी यांना वैदिक देवता रण्णा सण्णा देवी असावी असे वाटते. खानदेशांतील लोकप्रिय देवतेचे रूप भुलाबाईच्या गाण्यांत दाखल झाले असावे.
 'शोपा' या जिरे बडिशेप सदृश पदार्थाचा उल्लेख भुलाबाईच्या गाण्यातून बऱ्याचदा येतो. 'शेपा' बाळंतिणीस खोबऱ्याबरोबर खाण्यास देतात.त्या दुग्धवर्धक असतात असे मानले जाते. या उत्सवात भुलाबाई ही बाळंतपणासाठी माहेरी आलेली असल्याने 'शोपा'चा उल्लेख त्यात आला असावा.
 या गीतात भुलाबाई माहेरी निघाल्याचे चित्र रेखाटलेले आहे. ती निळ्या किंवा जांभळ्या क्वचित हिरव्या घोड्यावर आरूढ आहे. खानदेशात ती निळ्या घोड्यावर बसल्याचा उल्लेख येतो. तसेच लोककथांमधील वेगवान घोड्याचे पाय उलटे असतात. तांब्याभर पाण्याने न्हाऊन, बोटभर मेण आणि बोटभर कुंकू लेवून भुलाबाई माहेरी निघाली आहे. तिचे माहेर 'सोनारवाडा' आहे.

भूमी आणि स्त्री
१२१