पान:भूमी आणि स्त्री.pdf/१२२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कथा सर्वश्रुत आहे. त्यामुळेच धनगर समाज खंडोबास जावई मानतो. तो त्यांचे दैवत आहे. खंडोबाची अनेकविध गीते महाराष्ट्राच्या विविध भागांत प्रचलित आहेत. म्हाळसा आणि बाणाई यांच्या सवती मत्सराची कथा आणि त्यात खंडोबाची होणारी ओढाताण हा कथाबंध मराठी लोकजीवनात रुजलेला आहे. खेळ खंडोबा होणे म्हणजे संसाराची वासलात लागणे असा अर्थ का लावला जातो याचे इंगित वरील कथाबंधाशी निगडित आहे. भोंडला वा हादग्याच्या नमनगीतात खेळाचा उल्लेख आहे. भुलाबाईच्या नमनगीतातही 'खेळ खेळणारा खंडोबा येतो' हा खेळ संसाराचा असावा आणि हा खेळ अखंडपणे खेळला जाणार आहे. ही क्रीडा जगरहाटीची आहे. सृजनाची आहे. मराठवाड्यात, ग्रामीण भागात जुन्या स्त्रियांच्या बोलण्यात स्त्रीपुरुष समागमासाठी 'खेळणे' हा शब्द वापरला जातो.
 या गीतांत खंडोबाच्या नारी बाई वसा वसा आवष्णी
    आवष्णींच पाणी जसं गंगेच पाणी।।
अशा ओळी आहेत. खंडोबाच्या नारींचा येथे आवर्जून उल्लेख का आला असावा?
 खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजापासून ते कोळी, सुतार भटके समाजातील विविध जातींचे लोक या दैवताची श्रद्धेने पूजा करतात. महाराष्ट्रातील लोकसाहित्याचे आणि लोकसंस्कृतीचे सन्माननीय अभ्यासक श्री.डॉ. रा. चिं. ढेरे खंडोबाला लोकदेव म्हणतात. खंडोबाला शिवाचा अवतार मानतात. मणिमल्लासुरांचा वध करण्यासाठी शिवाने शक्ती निर्माण केली आणि स्वतः मार्तण्डभैरवाचे रूप धारण केले. ही शक्ती म्हणजेच म्हाळसा .... महालया. खंडोबाच्या म्हाळसा, बाणाई या नारीव्यतिरिक्त पालाई ही पाली गावची गवळण त्याची भक्त होती. तिच्यासाठी तो पालीस प्रकटला अशी आख्यायिका आहे. खंडोबाला नवस बोलून मुली वाहण्याची प्रथा महाराष्ट्र कर्नाटकात अलीकडच्या काळापर्यंत चालू होती. खंडोबाला अर्पण केलेल्या या मुरळ्यांचा खंडोबाशी विवाह लावून देत.
 गंगा आणि उमा यांच्यात सवतीमत्सर उत्पन्न झाल्याने शंकराने त्यांना एकत्व दिल्याची कथा सर्वश्रुत आहे. कर्नाटकात म्हाळसेला माळव्व नावाने ओळखतात. तिला गंगी माळव्व आणि तुप्पद माळव्व अशी नावे आहेत. गंगा उमेच्या भांडणाची व नंतरच्या एकत्वाची लोककथा बीजभूत मानून तशीच कथा म्हाळसा व गंगेच्या एकत्वाची सांगितली जाते.

भूमी आणि स्त्री
११७