पान:भूमी आणि स्त्री.pdf/११८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सांजाबाईच्या चालणाऱ्या प्रथेबाबत माहिती नव्हती. सांझी या व्रताच्या मूळ कल्पनेबद्दल डॉ. कुलदीप लिहितात, 'ब्रज की सांझी एक प्रसिद्ध कला है। जिसका प्रारंभ पौराणिक दृष्टीसे राधारानीको प्रसन्न करने के लिओ श्रीकृष्ण ने किया था। सबसे पहिले शरद ऋतु की संध्या को यह फुलों से बनाई गई थी. इसीलिए इसका नाम साँझी पडा।'
 सातत्य राखून बदल स्वीकारणे, तो अंतरात एकरूप करून घेणे हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. सार्वत्रिक होणे (प्रिव्हेलेन्स) प्रतिकूल परिस्थितीतही टिकून राहणे (सर्वाव्हयल) अवशेष रूपाने राहणे आणि लुप्त होणे (ॲबसोलेट) या प्रक्रियांद्वारे (प्रोसेस) बदल घडत असतात. ही गाणी कोणे एके काळी सार्वत्रिकपणे प्रचलित असतील. त्यामुळेच काळाच्या ओघात प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली तरीही ती चिवटपणे टिकून राहिली. मात्र त्यातील कालबाह्य, काळास महत्त्वपूर्ण न वाटणारा भाग लुप्त झाला आणि त्यांचे अवशेष पूर्वेतिहासाची साक्ष देत जिवंत राहिले. आज गाण्यांमध्ये वरवर पाहता वाटणारी निरर्थकता या चारही प्रक्रियांनी नीट समजून घेतल्यास सहजपणे लक्षात येते. निरर्थकतेतील 'अर्थ' उलगडण्यास मदत होते.
 'सांझी' मध्य प्रदेश, राजस्थान, व्रजभूमी, बंगालचा काही भाग इ. भागांत विविध रूपातूंन साजरी केली जाते. भुलाबाईच्या गाण्यात शिरलेली ही 'आरती' बाहेरून भुलाबाई या व्रतात दाखल झाली असावी की 'सांझी' चे मराठी रूप 'भुलाबाई' उत्सव हे असावे ? भुलाबाईच्या गाण्यांचा शोध घेत असताना 'सांझी'च्या गाण्यांचा आशय पडताळून पाहणेही महत्त्वाचे ठरणारे होईल. परंतु प्रस्तुत अभ्यासाच्या कक्षेत हा विषय येत नसल्याने इथे केवळ दिशासूचन केले आहे. भुलाबाईचे नमनगीत 'पहिली ग भुलाबाई' हे आहे. ते रोज म्हटलेच जाते. भोंडला आणि भुलाबाईची नमनगीते सोडल्यास, इतर गाणी दोनही उत्सवांत म्हटली जातात. भुलाबाईचे नमनगीत तीन तुकड्यांचे असून येथे त्याचा सलगपणे शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.
 उमेचे माहेरपण आणि बाळंतपण -
 भुलाबाई उत्सवांत उमेचे ऊर्फ पार्वतीचे केवळ माहेरपण अभिप्रेत नसून हे दिवस तिच्या बाळंतपणाचे आहेत. भुलाबाई हा 'सृजना' च्या सत्काराचा उत्सव आहे.

भूमी आणि स्त्री
११३