पान:भूमी आणि स्त्री.pdf/११६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 लोक लक्ष्मीचे रूप -
 आपल्याकडे लेकीलाही 'लक्ष्मी' मानले जाते. विवाहानंतर घरी येणारी लेक 'सवाष्ण' म्हणून सन्मानित केली जाते. सवाष्ण ही मांगल्य, समृद्धी, निरंतर सौभाग्याचे प्रतीक असते. आजही शुक्रवारचे बोडण, गौरी यासाठी सवाष्ण म्हणून माहेरवाशिणीचा मान केला जातो. कुमारिकांची, सप्तमातृकांची पूजा करण्याचा आचार मातृसत्ताक कृषिसंस्कृतीतून आजच्या प्रचलित व्रतवैकल्यांत समाविष्ट झाला असावा. या सातमातृका म्हणजेच सातघरच्या पाहुण्या. त्या माहेरपणाला आल्या आहेत. त्यांना नागरसाडे नेसवून ओटी भरून सन्मानित केले. त्यानंतर त्या सात जणी घराच्या खोल्यांतून गेल्या. खोलीत 'चितांग' टाकले. चितांग हा सोन्याचा दागिना आहे. खोलीत चितांग टाकतात म्हणजेच घर धनधान्य दुभत्याने भरून टाकतात. असा संकेत या ओळीतून मिळतो. या ओळी वाचताना गौरीगणपती विसर्जनानंतरची प्रथा आठवते. गौरी गणपती विसर्जनानंतर ताम्हणातून नदीतील वाळूखडे आणतात आणि ते घरातील प्रत्येक खोलीतून टाकतात. विशेषतः कोठीच्या खोलीत टाकतात. असे केल्याने घराला नेहमीच भरभराट लाभते अशी कल्पना आहे.
 स्त्रीगीतात निरर्थक शब्द पादपूरके म्हणून वारंवार येतात. त्यातून प्रासही साधला जातो. 'चिटक्या मिटक्या' हा शब्द गीतात असाच आलेला आहे. करडफूल म्हणजे करडईचे फूल. हे फूल लाल पिवळे असते. शुभता आणि मांगल्याचे प्रतीक हळदीकुंकू. निरंतर समृद्धी सौभाग्याचे प्रतीक हळदीकुंकू तेही लाल पिवळे. ते फूल हादगा देवास वाहिल्याचा उल्लेख येतो. काही भागांत हे गाणे इथेच समाप्त होते. तर काही ठिकाणी त्याच्या पुढे आधुनिक काळात जोडलेला तुकडा आढळतो. लोककथांतील एक लोकप्रिय कथाबंध आहे. एक वस्तू देऊन दुसरी घेणे ती देऊन तिसरी घेणे. या गाण्यातील शेवटचा तुकडा अशाच आशयाचा आहे. बाईच्या परसातला लिंबारा खाऊन गाय भरपूर दूध देईल. ते दूध बापाला देऊन त्याच्याकडला अंगारा घेऊन आईला दिला जाईल. तिच्याकडचं लुगडं बहिणीला. लुगड्याबदली धोतर घेऊन ते भावाला आणि त्या बदली गोंडे घेण्याचे एक स्वप्न इथे रेखाटले आहे. या गीतातील सामाजिक व्यवस्थेचा अतिशय तरल धागा

भूमी आणि स्त्री
१११