Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/११५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 सात, सोळा, वीस हे संख्यावाचक शब्दही लोकसाहित्यातून मांगल्याचे धनसंपन्नतेचे प्रतीक म्हणून येतात. 'वीस' हा आकडा गणनपद्धतीत अत्यन्त महत्त्वाचा आहे. खेड्यातील अडाणी महिला'दोन विसा' ४० तीन विसा ६० असा वापर करते. अशा रीतीने गणन करण्याची ही पद्धत पुरातन आहे.
 मावल्या : सात मातृका : सात घरच्या पाहुण्या -
 पौर अथवा नागर आणि जनपद असे दोन भाग राज्यांचे असत. नगरांत उच्चभ्रू, सरदार, व्यापारी, अधिकारी यांची वसाहत असे.तर जनपदांत लहानलहान ग्रामांचा अंतर्भाव असे. त्यात मुख्यतः शेतकरी, शेतीचे जोड व्यवसाय करणारे कारागीर राहत असत. ग्रामीण भागात राहणाऱ्यांना नगराबद्दल नेहमीच उत्सुकता आणि आकर्षण असते. विशेषतः नगरातील आधुनिक, चमकदार वस्तूंबद्दल विलक्षण आकर्षण असते. 'नागर साड्यां' चा उल्लेख त्याच भावनेतून आलेला आहे. साडी नेसविणे हे सन्मानाचे आणि प्रतिष्ठेचे मानले जाते. ही गाणी लेकीबाळींच्या ओठी असतात. त्यांतील साडे,गोंडे यांचे उल्लेख माहेरपणातून माहेरवशिणीस मिळणाऱ्या हक्काच्या आहेराचे आहेत. माहेरची श्रीमंती वा समृद्धी हा स्त्रीच्या मनातील नाजूक भावबंध आहे.

नेसा नेसा ग मावल्यांनो (भावल्यांनो)
सात घरच्या पावण्यांनो
पावण्या गेल्या खोली
चितांग टाकलं डोली

या ओळीतील सात घरच्या पाहुण्या कोणत्या ? त्या मावल्या की भावल्या ? कृषिप्रधान संस्कृती मातृपूजक होती. भारतात सप्तमातृकांची पूजा सर्वच प्रांतांतून होत असे. त्यांना सात बहिणी असेही म्हणतात. या सातमाता धनधान्याची समृद्धी देतात, संकटे आणतात, रोगराई दूर करतात अशी समजूत आहे. प्राचीन वाङ्मयातून, लेण्यांतून, सप्तमातृकांचे उल्लेख वा मूर्ती आढळतात. आंध्र- कर्नाटकतामिळनाडूत आजही सप्तमातृकांची पूजा होते.

११०
भूमी आणि स्त्री