Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/११४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अंगारा दिला आईला
आई आई लुगड ग
लुगड दिलं बहिणीला
बहिणी बहिणी धोतर ग
धोतर दिलं भावाला
भावा भावा गोंडे दे
माळावरचे धोंडे घे

 'अतुला मातुला चरणी चतुला' या ओळीचा एक पर्याय 'हातुका मातुका चरणी चतूका' असाही आहे. तसेच दुसऱ्या ओळीचा पर्याय 'चरणीच्या सोंडेवरी बाळा खुळखुळ गोंडेवरी' असाही आहे. गीतातील शब्दप्रतिमा यातून मिळणान्या संकेतांची संगती लावणे अतिशय कठीण काम आहे.
 'आतुला मातुला' या ओळीवरून आणि त्या ओळींच्या लयीच्या वजनावरून मराठी कहाण्यांमधील शेवटची ओळ आठवते. 'उतु नकोस मातु नकोस घेतला वसा टाकू नकोस'. व्रत पाळताना वा त्या व्रताचे फळ मिळाल्यावर उत्तान होऊ नकोस किंवा ते व्रत अर्ध्यावर सोडू नकोस अशी सज्जड समज त्यातून दिलेली असे. तसेच उतण्यामातण्यापासून दूर राहिलास तर समृद्धी प्राप्त होईल अशी ग्वाही त्यातून ध्वनित होत असते.
 भोंडला-भुलाबाईच्या गाण्यातून 'बाळा' चे उल्लेख वारंवार येत असतात. भुलाबाईच्या मातीच्या मूर्तीच्या मांडीवर वा समोर पाळण्यात बाळ असतेच. भुलाबाईच्या गाण्यात तिच्या बाळंतपणाच्या सोहळ्याचा उल्लेख असतो. भुलाबाईच्या उत्सवाच्या गाण्यातून हा संदर्भ या गाण्यात दाखल झाला असावा. भुलाबाईचे बाळ हे गणेश बाळच असते. आणि गणेशबाळाचे तोंड हत्तीसारखे असते हे सर्वज्ञात आहे. हत्तीने सोंडेने बाळ उचलून वाचविण्याच्या अनेक गोष्टी लोककथांतून विपुल प्रमाणात सापडतात.
 'गोंड्या' चा उल्लेखही या गीतातून अनेकदा येतो. आपल्या बंधुरायाकडे गोंडे मागणाऱ्या बहिणी लोकगीतातून भेटत असतात. गोंडे हे थाटाचे, समृद्धीचे दर्शक असतात. म्हणूनच लोकजीवनात गोंड्याची गाडी, शिंगांना गोंडेफूल बांधलेले बैल, वेणीला बांधलेले गोंडे यांना समृद्धीदर्शक महत्त्व असते.

भूमी आणि स्त्री
१०९