दुराचारात जमा झाला असला तरी यम आणि यमीची वेदकालीन कथा काय सांगते? यमी यमाशी समागम करण्यास उत्सुक होती. परंतु यम हा तिचा सहोदर असल्याने त्याने तिला झिडकारले. त्यावेळी यमी त्याला दाखला देते की आकाश व पृथ्वी सहोदर बंधुभगिनी आहेत, तरी ते पतिपत्नी झालेले आहेत.
रामायणातील राम आणि सीता यांचे नाते सपिंडविवाहाचे नसून पुरुषप्रधान संस्कृतीतील भिन्नगोत्रिय विवाहांतून निर्माण झालेले आहे. ते पितृसत्ताक जीवनपद्धती स्थिरावल्यानंतरचे आहे.
या गीतातील राम डोंगरात लपणारा का ? -
या गीतातील राम पायी चालणारा आणि डोंगरात नाहीसा होणारा असा का आहे? डोंगर शोधूनही रामाचा पत्ता लागला नाही असा उल्लेख का येतो? या ठिकाणी विवाहास पूर्वरूढीनुसार उत्सुक असणारी यमी आणि तिला झिडकारून बहीणभावाच्या नात्याचे आज अस्तित्वात असलेले रूप प्रस्थापित करू पाहणारा यम यांची आठवण येते.
सीता ही भूमिकन्या असून धरतीचे रूप मानली जाते. तर सावळा राम निळ्या आकाशाचे प्रतीक मानला जातो. आकाशातून कोसळणारा पाऊस आणि माती यांच्या संयोगातून बीज रुजते. कृषिसंपत्ती निर्माण होते. या गीतातील रामसीतेचा संदर्भ कृषिजीवनाच्या दृष्टीतून येतात. या गीतात विवाहाचा उल्लेख आहे. जरतारी बोहोलं आहे आणि नवरानवरी पाटावर बसले आहेत. हे नवरा नवरी कोण ? आकाश आणि भूमी ? म्हणजेच राम आणि सीता का ?
पुरुषप्रधान आर्य संस्कृतीचा संस्कार -
भोंडला आणि हादगा हे 'वर्षना'चा सत्कार करणारे उत्सव आहेत. वर्षनातून सर्जन घडत असते. वर्षा हे समृद्धीचे मूळ आहे असे मानणाऱ्या बीजप्रधान अथवा पुरुषप्रधान संस्कृतीचे संस्कार या उत्सवातून अधिक्याने जाणवतात.या गाण्यातील प्रत्येक ओळ जणु वेगवेगळ्या काळाचा रंग धारण करणारी असते. या गीतातील पुढील ओळी वेगळीच कलाटणी घेतात.
पाटी पाटी तिरूबाई राळा
तिरू तिरू राळा मुंजक बाळा