पान:भूमी आणि स्त्री.pdf/१०५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 भोंडला वा हादगा मांडल्यावर पहिल्या दिवशीचे पहिले गाणे म्हणून ऐलमा पैलमा या गाण्याला मान दिला जातो, 'ऐलमा पैलमा' या नमनगीताला. हे गीत रोजच म्हटले जाते.
 भारतात विशेषकरून महाराष्ट्रात कोणतेही शुभकार्य गणेशपूजनाने सुरू होते. त्यामुळे सुरुवातीचे हे नमन गणेशदेवाला गायले आहे. हे परंपरेला धरून आहे.
 ऐलमा पैलमा : ऐल-पैल -
 ऐलमा पैलमा या शब्दांची व्युत्पत्ती इतिहासाचार्य राजवाडेंनी;
 ऐलमा = अथलम् → अहलम् → अअलम् → अयलम्
 पैलमा = प्रथलम् → प्रहलम् → प्रअलम् → पयलम्
अशी मांडली आहे.
 ऐल पैल या दोन शब्दांना मराठी भाषेत विशिष्ट अर्थ आहे. त्यातून विशिष्ट संकेत मिळतो. ऐल म्हणजे अलीकडचे, पैल म्हणजे पलीकडचे. परंतु ऐल म्हणजे ईहलोक तर पैल म्हणजे परलोक असा संकेत त्यातून दर्शविला जातो. माणसाला ईहलोकीचे जीवन जगत असताना परलोकाविषयी नेहमीच आकर्षण असते. ऐल आणि पैल यांच्यामध्ये वेस असते. या वेशीच्या दारांतला खेळ प्रपंचाचा तर नसेल ना ? या गीतातला खेळ लुटुपुटुचा असला तरी तो प्रतीकात्मक असावा. तो जगरहाटीचा असावा. आपल्याकडे दिवाळीत वसुबारसेला शेणामातीचे गोकुळ मांडून खेळण्याची प्रथा आहे.
 हे उत्सव वर्षनसर्जनाचे आहेत. कृषिजीवनाशी निगडित विधी मुळातून वेशीच्या आत होत नसावेत. उदा. नागपंचमीची पूजा रानात जाऊन वारूळ पुजून केली जायची. काळाच्या ओघात बदलत्या जीवनपद्धतीमुळे ही पूजा पाटावर नागकुळे काढून केली जाऊ लागली. कृषिजीवनाशी संबंधित अशा या उत्सवांचे मूळ रूप वेशीच्या दारात, मोकळ्या आभाळाखाली, साजरे होत असले पाहिजे.
 या गाण्यात पारव्याच्या घुमण्याचा उल्लेख आहे. हे 'पारव' कबुतर की आणखी काही? पारवं या शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक अर्थ 'जंगली कबुतर' असा तर दुसरा 'रंगदर्शक' आहे. 'काळे पांढरे मेळविता, पारवे होते तत्त्वता', असे म्हटले आहेच. एक पाठमेद पारवळ असाही आहे 'पारवळ' म्हणजे लुगड-पातळ. परंतु

१००
भूमी आणि स्त्री