Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/१०३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 गाण्यांचे पर्याय : कारणांचा मागोवा -
 ही सारीच गाणी मुळात मौखिक स्वरूपाची असून ती पिढ्यानपिढ्या विविध काळातून वाहत आली आहेत. ही गाणी कुमारिकांच्या - नवतरुणींच्या म्हणजेच स्त्रियांच्या उत्सवांची आहेत. स्त्रियांना धर्माने ज्ञानसाधनेचा अधिकार दिलेला नव्हता. त्या शिक्षणापासून वंचित होत्या. मोठ्या घराण्यांतील आणि उच्चवर्णातील स्त्रियांना व्यवहारापुरते शिक्षण दिले जाई. संस्कृत नाटकातील दास आणि स्त्रिया यांची भाषा 'प्राकृत' असे. ते संस्कृतमधून बोलत नसत. स्त्रिया अडाणी असल्याने अशुद्ध बोलतात, हे समाज गृहीत धरीत असतो. निरक्षरतेमुळे त्यांना शब्दांचे उच्चार नेमके करता येत नाहीत हेही गृहीत धरलेले असते. भाषाशास्त्राच्या अभ्यासात उच्चारप्रक्रियेत होणाऱ्या बदलाची कारणमीमांसा करताना स्त्रियांमुळे उच्चारात बदल होतात असे मानले जाते. स्त्रीजीवनाशी संबंधित गाणी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाताना, एका समूहाकडून दुसऱ्या समूहाकडे प्रवाहित होताना त्यात बदल होणे स्वाभाविकच आहे. शब्दात आणि त्यामुळे आशयात बदल झाले असावेत.
 ही लोकगीते शेकडो वर्षांपासून विविध काळातून प्रवाहित होत असताना त्या त्या काळाचे संदर्भ त्यांना जोडले जातात. ज्या श्रद्धा वा संकल्पना, समाजाला फारशा महत्त्वाच्या वाटेनाशा होतात. त्या गीतातून गळून नामशेष होतात. काळानुरूप नव्या संकल्पना त्यात दाखल होतात. अशा रीतीने लोकगीत सतत बदलत राहते.
 स्त्रियांचे जीवन दोन अंगणातून फुलते. घरातल्या लेकी-सुना लोकगीतांचे अनमोल धन गावोगाव पसरवतात. बारा गावच्या बारा जणी एका जागी जमतात तेव्हा एकमेकींची गाणीच नव्हे तर उत्सवांतील विविध कृतींचे तपशील, आराध्यदैवते यांचीही देवाणघेवाण होते. या प्रक्रियेतून गाण्यांची सरमिसळ होते. पर्याय निर्माण होतात.
 लोकगीतांत समूहमनाचे प्रतिबिंब -
 भोंडला भुलाबाईची गाणी परंपरेने चालत आलेली लोकगीते आहेत. त्यांचे मर्म उकलताना, त्यातील अर्थसंदर्भाचा वा कालसंदर्भाचा मागोवा घेताना, कवितेच्या आस्वादनाची रीत वापरता येत नाही. या गीतांत समूहमनाचे प्रतिबिंब असते. या गीतांचा कर्ता केवळ 'अनाम' असतो. असे नाही तर या गीतांत अनेक अनामिकांनी आपापल्या काळाचे आणि मनाचे रंग मिसळवलेले असतात. मानवी मनाच्या

९८
भूमी आणि स्त्री