Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/१०२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कोणत्याही व्रतात आरंभ, संकल्प, पूजा, होम, उपवास, दान, अन्नदान, पारणे, जागरण व उद्यापन या गोष्टी येतात. भोंडला-भुलाबाई उत्सवात नियमांची साचेबंद चौकट नाही. होमहवन, पारणे, उपवास, दान आदी त्यात नसते. ते कुमारिकांचे लोकोत्सव आहेत, हे म्हणण्यामागची भूमिका वरील विवेचनात मांडली आहे.
 मूळ गाणी सोळा -
 या उत्सवप्रसंगी गायल्या जाणाऱ्या गाण्यांची मूळ संख्या किती हे सांगणे कठीण आहे. इतिहासचार्य वि. का. राजवाडेंनी अठरा गाणी संकलित केली आहेत. तर अनंत देवधरांनी सात महत्त्वाची गाणी लेखात समाविष्ट केली आहेत. डॉ सरोजिनी बाबरांनी संपादित केलेल्या 'भोंडला-मुलाबाई' या लोकसाहित्यमालेच्या बाविसाव्या भागांत विविध विभागात गायिली जाणारी भोंडला-हादग्याची ९६ गाणी आणि भुलाबाईंची ५६ गाणी संकलित केली आहेत.
 आज या गाण्यांची सरमिसळ सर्व विभागांतील गाण्यांतून आढळते. पुष्कळदा दोन गाण्यांचे तुकडे जोडून एक गाणे बनलेले दिसते. या तुकडेजोडीतून अनेक गाणी तयार झालेली असली तरी दोनही उत्सवांची मूळ गाणी सोळाच असावीत. हादगा मांडल्यावर पहिल्या दिवशी एक गाणे व एक खाऊ असे समीकरण असे. सोळाव्या दिवशी सोळा खिरापती वाटीत आणि सोळा गाणी म्हणली जात. भारतीय जीवनपद्धतीत सोळा हा अंक शुभ आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. गौरीसाठी सोळा भाज्या जेवणात लागतात तर मंगळा गौरीसाठी सोळा प्रकारच्या पत्री गोळा केल्या जातात. दुर्गाताई भागवतांच्या मते मूळ गाणी सोळाच असावीत. त्यात गौरी वा तत्सम उत्सवांतून काही गाणी दाखल झाली असावीत.
 महाराष्ट्रातील सर्व भागांत प्रचलित असलेली सर्व गाणी लोकसाहित्यमालेच्या २२ व्या भागात संकलित केलेली आहेत. या शोधनिबंधासाठी वऱ्हाड, खानदेश, पंढरपूर, पुणे, शहादा, हिंगोली,रत्नागिरी, नाशिक, नगर इत्यादी परिसरातून गाणी गोळा करताना सतत जाणावले की उपलब्ध होणारे प्रत्येक गाणे पर्याप्तभेदासह वरील ग्रंथात आहे. आणि म्हणूनच या शोधनिबंधासाठी शोधनार्थ निवडलेली गाणी प्रामुख्याने 'भोंडला-भुलाबाई' या ग्रंथातून निवडली आहेत. भोंडला आणि भुलाबाईचे नमन गीत आणि प्रत्येकी इतर दोन गीते अशा एकूण सहा गाण्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.

भूमी आणि स्त्री
९७