लालपांढऱ्या रंगात विशिष्ट आकृती पारंपरिक शैलीने काढल्या जातात. चौपट, पगल्या लक्ष्मीची पावले, चोपड़ा (हळद कुंकवाचा चौफुला) इत्यादी आकार काढतात. बंगालात अल्पना मांडली जाते. कर्नाटक, आंध्र, तामिळनाडूतही रांगोळीचे प्रस्थ आहे. सुने अंगण क्वचितच आढळणार. या वैशिष्ट्यपूर्ण रांगोळ्या ठराविक पद्धतीने काढण्याचे ज्ञान आणि कसब स्त्रिया परंपरेने आत्मसात करतात.
भोंडला वा हादगा मांडतात. पाटावर रांगोळीचा हत्ती काढतात. पाट मधोमध ठेवून भोवताली रांगोळी व फुलांची सजावट करतात. भुलाबाई मांडताना कोनाड्याच्या मखराच्या सजावटीला विशेष महत्त्व दिले जाते. श्री.अनंत देवधरांच्या शोधटिपणात डाळ तांदूळ एकत्र करून त्याच्या बहिलोबा व बहिलोबाईच्या आकृती काढतात असा उल्लेख आहे. मध्य प्रदेशात संजाबाई नावाचा उत्सव भाद्रपद पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमेपर्यंत मुली खेळतात. ही संजाबाई, हिरव्यागार शेणाच्या आकृती भिंतीवर लिंपून त्यावर बेगड आणि फुलांच्या पाकळ्या चिटकवून मांडली जाते.
आश्विन भाद्रपदातील वर्षनसर्जनाच्या उत्सवात मांडणी व नंतर खेळ या दोन्ही क्रिया महत्त्वाच्या असाव्यात. गौरी, ज्याला घाटावर लक्ष्म्या किंवा महालक्ष्मी असे संबोधिले जाते, त्याची सजावटही अतिशय काटेकोरपणे आणि विधिपूर्वक केली जाते. घाटावर लक्ष्म्यांची गाणी ऐकिवात नाहीत. परंतु कोकणात गौरीची गाणी आणि भोंडला भुलाबाईची गाणी यांत एक आंतरिक साम्य आहे. विदर्भातील भराडी गौर वा इनाईची गाणीही त्याच वाणाची असतात. ही गाणीही स्त्रिया परंपरेने शिकतात.
उदा. आचे दूध तापे
त्यावर पिवळी साय
लेकी भुलाबाई साखळ्या लेऊन जाय (भुलाबाई)
अंगणी तापतंय दूध
दूधा पिवळी साय
ये ग गवरी बाई
एवढं पिऊनी जाय
(गौरी : संकलक - डॉ. चारुशीला गुप्ते)
आंगनी दुदुलं तपते महया लाडाचे गवरा
दूध घेऊनी जाय
(इनाई :संकलक - वसंत गिरटकर)