पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६८

रौद्ररस.

 क्रोध नामक मनोवृत्तीची पूर्णावस्था, तो रौद्ररस होय.

 ह्यांत क्रोध हा स्थायीभाव आहे. हा विकार, अपकार, मानभंग, सुजनांची अथवा पूज्यजनांची निंदाश्रवण, शत्रूची वर्तणूक किंवा चेष्टा इत्यादिकांपासून उत्पन्न होतो, तो विभाव; यामुळें स्फुरण, डोळे लाल होणें, निर्भत्सना करणें, मारण्यास धांवणें इत्यादि अनुभाव; व नंतर उग्रता, चपलता, खेद, स्मृति, आवेग, अमर्षे, गर्व इत्यादि व्यभिचारीभाव.

 उदाहरण-"आपल्या सरदारांचा अपमान झाला, हें बाजीरावास कळतांच, त्याचे नेत्र लाल झाले, ओंठ स्फुरण करूं लागले, व गादीवरून ताडकन उठून, आजच यवनावर स्वारी करण्यास निघावयाचें, असा हुकुम दिला."

 ह्यांत 'यवन' ह्या आलंबनविभावानें बाजीरावाच्या मनांत क्रोध उत्पन्न झाला, तो आपल्या सरदारांचा अपमान होणें ह्या उद्दीपन विभावानें वृद्धिंगत होऊन, गर्व, असूया, अमर्ष, अवहित्थ इत्यादि संचारीभावांनीं तो आणखी प्रदीप्त केला. व डोळे लाल होणें, ओंठाचें स्फुरण, एकदम उठणें, स्वारीचा हुकूम देणें, इत्यादि अनुभवांनीं त्याची पूर्णावस्था स्पष्ट प्रत्ययास आली. म्हणून येथें रौद्ररस झाला आहे.

हास्यरस.

 हास ह्या मनोवृत्तीची पूर्णावस्था तो हास्यरस होय.