पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६७

 उदाहरण-“ज्याला धरण्याकरितां मोठमोठ्चा वीरांनांही अनेक मसलती कराव्या लागल्या, जो थोड्याच दिवसांपूर्वी सिंहासारख्या गर्जना करीत होता, ज्यानें सात महा पराक्रमी अतिरथींस एकदम अटकेंत ठेविलें, त्या वीरशिरोमणि टिकेंद्रजितास साधारण कैद्यापेक्षांही अधिक विपत्तीनें ग्रासावें, व पायांत शृंखला असतांही पिंजऱ्यांत राहण्याचा प्रसंग यावा काय? शिव शिव! देवा, आतां माझा साह्यकारी कोण राहिला? माझ्या करितां बिचाऱ्यावर हा प्रसंग आलाना?" असें ह्मणून महाराज एकदम मूर्छित होऊन खालीं पडले.

 ह्यांत, टिकेंद्रजित ह्या आलंबन विभावानें त्याविषयीं मणिपूरच्या महाराजाच्या मनांत शोक नामक मनोवृत्ति उत्पन्न होऊन, ती त्याचें कैद होणें, त्याच्या पायांत बेड्या पडणें, पिंजऱ्यांत अटकणें, इत्यादि उद्दीपन विभावांनीं वृद्धिंगत झाली. व स्मृति, चिंता, मोह, दैन्य, शंका, निर्वेद इत्यादिक संचारीभावांनीं परिपुष्ट होत्साती, मूर्छा येणें, खालीं पडणें, इत्यादि अनुभावांनीं स्पष्ट प्रत्ययास आली, ह्मणून येथें करुणरस झाला आहे.

 ह्यांत स्वनिष्टपरनिष्ट असे दोन भेद आहेत. स्वतः आपल्यावरच आलेल्या संकटाविषयीं जो शोक तो स्वनिष्ट होय आणि दुसऱ्याचें संकट पाहून किंवा ऐकून जो शोक होतो तो परनिष्ट.