पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६६

छत्रसालाजवळ येऊन पोहचला; तरी त्याची भेट न घेतां परभारा त्याच्या शत्रूवर त्यानें चाल केली, व त्याचा त्यानें पराभव केला.”

 ह्यांत छत्रसालाचा शत्रु ह्या आलंबन-विभावानें बाजीरावाच्या मनांत त्याशीं युद्ध करण्याचा उत्साह उत्पन्न होऊन, तो मित्रावरचें संकट, त्याचे साह्यार्थ पाचारण ह्या उद्दीपन विभावांनीं वाढला, व औत्सुक्य, हर्ष, अमर्ष, इत्यादि संचारीभावांनीं अधिक पुष्ट होऊन बाहुस्फुरण, एकदम प्रयाण, शत्रूवर परभरें चाल करून जाणें, इत्यादि अनुभावांनीं तो पूर्ण उत्कर्षास पावल्याचें प्रकट झालें, ह्मणून येथें वीररस झाला आहे.

 ह्याच प्रमाणें दान, दया, पांडित्यादिकांचीं उदाहरणें अन्यत्र पाहून व्यावीं.

करुणरस.

 शोक ह्या मनोवृत्तीची पूर्णावस्था तो करुणरस होय.

 ह्यांत शोक हा स्थायीभाव आहे. प्रियवस्तूचा नाश, त्रास, बंधन, संकट, दारिद्य, राजाचा कोप, शापापासून होणारी दु:खें (शोक) इत्यादि विभाव; व हीं दुःखें प्राप्त झालीं म्हणजे मनुष्य चिंतातुर होती, त्यास कांहीं सुचेनासें होतें, तो रडूं लागतो, भ्रम पडतो, ग्लानि येते, धैर्य सुटतें, इत्यादि अनुभाव; आणि ह्यामुळे निर्वेद, चिंता, ग्लानि, दैन्य, जडता, मोह, विषाद, व्याधि, आलस्य, आवेग, शंका, इत्यादि व्यभिचाराभाव होत.