पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६२

कडे पाहिलें, ह्मणजे हे कामदेवाचे बाणच आहेत, असा भास होतो; व तुझ्या सख्या जवळ उभ्या आहेत, तरी त्यांची भीति न ठेवितां, तूं जवळ जाऊन खुशाल आपल्या प्रियेस आलिंगन दे, असेंच जणूं काय ह्या वृक्षांवर वेष्टिलेल्या लता मला सुचवीत आहेत, असें वाटतें; तुझ्या सख्या पलीकडे कशा जातील, मला एकांतांत गांठ कशी पडेल, ह्या विवंचनेंत मी मझ असतां, ह्या झंझावातानें मजवर कृपा करून मला तुझ्या एकांत समागमाचा योग आणून दिला. हे वायो, कांहीं वेळ असाच वहा; माझ्या, प्रियेच्या सख्यांस ह्या लतामंडपांत येऊं देऊं नको. प्रिये, आतां आपला कोमल बाहुरूप हार माझ्या कंठांत घालून कृतार्थ कर. असें ह्मणून त्यानें तीस स्वतःच आलिंगन दिलें." इत्यादि.

 ह्यांत प्रीति हा स्थायीभाव ह्मणजे प्रधानमनोवृत्ति आहे. ती इष्ट स्त्रीचें दर्शन, ह्या जनक, आणि वसंतऋतु, व उद्यान, ह्या उद्दीपक कारणांनीं (विभावांनीं) आणि औत्सुक्य, चिंता, शंका, हर्षे, मोह, इत्यादि अप्रधान मनोवृत्तींनीं (संचारीभावांनीं) वृद्धिंगत होऊन, आलिंगन देणें ह्या कार्यानें (अनुभावानें) प्रकट झाली आहे.

विप्रलंभशृंगार.

 स्त्रीपुरुषांच्या वियोगस्थितीचें ज्यांत वर्णन केलेलें असतें त्यास विप्रलंभशृंगार ह्मणतात. ह्यांत रति हाच स्थायीभाव आहे.