पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६१

  ज्याला ज्यासंबंधानें रति उत्पन्न झाली, तो त्याचा आलंबनविभाव होय. एकांतस्थल, वनविहार, वसंत व शरद, चंद्रोदय, अलंकार, चेष्टा, नेत्रकटाक्ष इत्यादि जे रति उत्पन्न करण्यास कारण होतात, ते उद्दीपनविभाव होत. आलिंगन, चुंबनादि जे तद्दर्शक व्यवहार ते अनुभाव होत. आणि जे निर्वेदादि ३३ भाव वर सांगितले त्यांतील जे ह्याचें साह्य करितील ते व्यभिचारीभाव होत. यांवरून विभाव, अनुभाव आणि व्यभिचारीभाव ह्यांजकडून जो रति नामक स्थायीभाव पुष्ट होतो, तो संभोगशृंगार होय.

 ह्यांत आलस्य, जडता, आणि उग्रता, हे व्यभिचारीभाव येत नाहींत. परंतु मागें सांगितलेले सात्विक भाव, ते सर्व येतात.

 उदाहरण--

 "प्रिये, तुझें चंद्राप्रमाणें आल्हादकारक प्रसन्न मुख, व अनुपम लावण्य, मी ज्या दिवसापासून पाहिलें, त्याच दिवसापासून, हा जन तुझा दास झाला आहे. सांप्रत, नाना लतापत्रांनीं सुशोभित, व सुंदर पुष्पांच्या मधुर सुवासांनीं सुगंधित आणि मधुर गान गायन करणाच्या पक्षिगणांच्या मनोरम स्वरांनीं निनादित, अशा ह्या क्रीडोद्यानांत आज आकस्मिक तुझें दर्शन घडलें, त्यायोगानें तर मनाची जी स्थिति झाली आहे, ती सांगतां येत नाहीं. वसंतऋतूमुळे वृक्षांवर नवीन पल्लव फुटले आहेत, त्यांज-

  भा० ६