पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४५

 कोणीं कोणास ह्मटलें कीं--

 "सरकारानें संमतिवयाचा कायदा शेवटीं पास केलाच.” तर ह्या वाक्यांत कांहीं व्यंग्यार्थ नाहीं. पण ह्याचा वक्ता सुधारक व श्रोता जुन्या मताचा आहे असें मानिलें तर 'तुमच्या ओरडण्यानें कांहीं झालें नाहीं, शेवटीं सरकारानें आमचेंच ऐकिलें.' असा व्यंग्यार्थ प्रतीत होतो. वक्ता व श्रोता दोघेही सुधारक असले तर "एक काम तर सिद्धीस गेलें. आतां दुसरें कांहीं उपस्थित केलें पाहिजे.” असा व्यंग्यार्थ निघतो. किंवा दोघेही जुन्या मताचे असले तर, "सरकार लोकांचें कांहीं ऐकत नाहीं तस्मात् सरकारास अर्ज करून कांहीं फळ नाहीं." असा व्यंग्यार्थ प्रतीत होतो. अशा रीतीनें देशकालादिकांचीं उदाहरणें अन्यत्र पाहून घ्यावीं.

 पहिल्या शब्दाश्रितव्यंग्यार्थांत शब्दांला प्राधान्य असतें, आणि अर्थ त्यांचा साह्यकारी असतो. अर्थांश्रितव्यंग्यार्थांत अर्थास प्राधान्य असतें, आणि शब्द त्याचे साह्यकारी असतात.

-------
अर्थाचे दोष.

 अर्थाचे दोष पांच आहेत. ते हे:--

 १ अपुष्टार्थ, २ व्याहत, ३ पुनरुत, ४ दुष्क्रम, आणि ५ ग्राम्य. हे न येण्याविषयीं काळजी घेतली पाहिजे. ह्यांचीं लक्षणें व उदाहरणें.