पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४३

प्रकरणांत) दोन दोन अर्थांचे शब्द योजिले असतात व त्यांचा एक अर्थ त्या प्रसंगीं लागू असतो, व दुसरा केवळ चमत्कार मात्र उत्पन्न करितो, त्या ठिकाणीं तो दुसरा अर्थ व्यंग्यार्थ होय. जसें--

 "जो उदय होतांच पूर्वाशेस पूर्ण करितो तोच मित्र खरा."

 ह्या वाक्यांत सूर्याचा अर्थ वक्त्यास अभीष्ट आहे, तेव्हां तो काढून घेतल्यावर ह्याच वाक्यांतून उत्तम मित्राच्या संबंधाच्या अर्थाची जी प्रतीति होते तो व्यंग्यार्थ होय. ह्यांत उदयादिक जे द्वयर्थी शब्द आहेत ते काढून टाकून त्या जागीं त्याच अर्थाचे दुसरे शब्द घातले तर हा व्यंग्यार्थ उत्पन्न होणार नाहीं. अर्थात् तो ह्याच शब्दाच्या आधीन आहे. ह्मणून ह्यास शब्दाश्रित असें ह्मटलें आहे. निबंधमालेंतही एक असें वाक्य आहे कीं, "कंपिनीबाईनें अयोध्येंत पाय ठेवितांच तिला रामच ह्मणावा लागला."

 ह्या वाक्यांत कंपनी सरकारानें अयोध्येचें राज्य घेतल्यावर पुढें लागलीच कंपनी मोडली व राणी सरकारानें राज्यकारभार आपल्या हातीं घेतला. हा वाच्यार्थ वक्त्यास अभीष्ट आहे. तो घेतल्यानंतर सूक्ष्म दृष्टीनें पाहिलें असतां "एक वृद्ध स्त्री परम कृष्णभक्त होती तरी


 १ उगवणें, पक्षीं उत्कर्ष, २ पूर्वदिशा, पक्षीं पूर्वीच्या इच्छा, 3 सूर्य, पक्षीं स्नेही.