पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४१

नसून, ज्ञान, कृषि व यांत्रिक कलांच्या योगानें मिळणारा आहे. तस्मात् तें आपण केलें पाहिजे.” असा गूढ अभिप्राय दाखविण्याचा आहे.

 लक्ष्यार्थ ओळखण्याची मुख्य खूण हीच आहे कीं, भाषेंतील रूढीमुळें किंवा गूढार्थ सुचविण्याकरितां जेव्हां वाच्यार्थीचा वक्त्याच्या मुख्य अभीष्टार्थीशीं बाध येत असेल तेथेंच लक्ष्यार्थ घेतला पाहिजे.

-------------
व्यंग्यार्थ.

 शब्दाचा मुख्यार्थ जी वाच्यार्थ, किंवा गौण अर्थ जो लक्ष्यार्थ, ह्या दोन्ही प्रकारच्या अर्थांहून भिन्न असा, शब्दापासून प्रतीत मात्र होणारा जो तिसरा अर्थ, तो व्यंग्यार्थ होय. जसें - एक मनुष्य एकास ह्मणती कीं, 'तुमच्या तोंडावर मूर्खत्वाचें प्रतिबिंब दिसतें.' त्यानें उत्तर दिलें कीं, 'माझें तोंड कांच आहे, हें मला आजच कळलें.' ह्या उत्तरांत 'तूंच मूर्ख आहेस, ह्मणून तुझ्याच तोंडाचें प्रतिबिंब माझ्या तोंडांत दिसतें.' हा जो अर्थ प्रतीत होती, तो वाक्यांत आलेल्या शब्दांपैकीं कीणत्याही शब्दाचा किंवा त्या सर्व वाक्याचा वाच्यार्थ नाहीं; किंवा वाच्यार्थीचा तात्पर्यार्थाशीं बाघ नसल्यामुळे लक्ष्यार्थही नाहीं; तर केवळ प्रतीत मात्र होणारा अर्थ आहे. हाच व्यंग्यार्थ होय. ह्यास ध्वन्यर्थ, प्रतीयमानार्थ, गम्यार्थ आणि व्यक्ति अशीही नांवें आहेत.