पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३९

हेंच त्याचें कर्तव्य आहे. आणि इंग्रज ग्रंथकारांचे लेख, सरकारी रिपोर्ट, सरकारचे बंदीजन बनलेल्या पत्रकारांचे उद्वार, पार्लमेंट सभेंत, हिंदुस्थानांत मिळालेल्या पैशावर चैन भोगणारे, व हल्लींही हिंदुस्थानाकडून ज्यांस पेनशन पोंहचत आहे अशा सर रिचर्डसारख्या लोकांचीं भाषणें पाहिलीं असतां कोणालाही वाटेल कीं, धन्य इंग्लंडाची! असलें थोर व उदारपणाचें कर्तव्य तें बजावीत आहे."

वाग्बाण.

 ह्यांत पहिले उदाहरणांत भूतदयेच्या संबंधानें जरी मॅन्चेस्टरच्या व्यापारी लोकांची स्तुति केली आहे, तरी वक्त्याचा अभिप्राय स्तुति करण्याचा नसून इतक्या क्षुल्लक गोष्टीनें देखील हिंदुस्थानच्या व्यापारास हरकत होईल असें करण्यांत मॅन्चेस्टरचे व्यापारी तत्पर असतात, अशी निंदा करावयाचा आहे.

 याचप्रमाणें दुसरे उदाहरणांतही समजावें.

 वरून निंदा व आंतून स्तुति असें वर्णन असलें, तरीही हाच अलंकार होतो.

 ४. लक्षित - पदांतील अवयवांवरून लक्षित होणारा जो विशेष अर्थ, तो लक्षितलक्ष्यार्थ होय. रूढ लक्षितलक्ष्यार्थात, शब्द रूढीवरूनच झालेले असतात, व ह्यांत ह्मणजे नैमित्तिक लक्षितलक्ष्यार्थात, व्यंग्यार्थसूचनांच्या निमित्तानें यौगिकादिक शब्दांची योजना केलेली असत. जसें--